CoronaVirus : धक्कादायक ! उदगीरमध्ये आणखी तिघांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या १४ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 07:23 PM2020-05-04T19:23:15+5:302020-05-04T19:26:12+5:30
उदगीरमधून आतापर्यंत २२३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये
लातूर : उदगीर येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी उदगीर येथील एकूण २८ व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले असून, त्यातील २१ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, चौघांची पुनर्तपासणी होणार आहे. तर तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाबाधित मयत महिलेसह एकूण बाधितांची संख्या १४ असून, १३ जणांवर उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत सोमवारी एकूण ३१ व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी २८ स्वॅब उदगीर येथील होते. त्यापैकी २१ निगेटिव्ह आहेत, तर ३ पॉझिटिव्ह आले आहेत. ४ व्यक्तींच्या स्वॅबची पुनर्तपासणी होणार आहे. उर्वरित तीन स्वॅब विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे होते. ते तिन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, उदगीरमधून आतापर्यंत २२३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. जे पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत, ते सर्व बाधित रुग्णांच्या नातेवाईक व निकट संपर्कातील आहेत.
दरम्यान, ४ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या बाह्य रुग्ण विभागात ६५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ६ हजार ७३२ व्यक्तींची तपासणी झाली आहे. त्यापैकी २३० व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून, २२२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लातुरात यात्रेकरू म्हणून आलेल्या ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, ते यापूर्वीच कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी सांगितले.