coronavirus : लातूर महापालिकेकडून शहरात धूर फवारणी; सार्वजनिक ठिकाणाच्या निर्जंतुकीकरणास प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 01:19 PM2020-03-24T13:19:25+5:302020-03-24T13:21:04+5:30
: बसस्थानक, रुग्णालय, गर्दीच्या भागात निर्जंतुकीकरण
लातूर : शहरात संचारबंदी असल्याने रस्त्यावर शुकशुकाट आहे. त्यामुळे शहर महानगरपालिकेकडून धूर फवारणी करण्यात येत आहे.
कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असून संचारबंदीमुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य आहेत. त्यामुळे शहरातील शहरात सर्वाधिक रहदारीचे ठिकाण असलेल्या सार्वजनिक चौकात फवारणी करण्यात येत आहे . छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालय, बसस्थानक, महात्मा गांधी चौक, गंजगोलाई, हनुमान चौक आदी ठिकाणी धूर फवारणी करण्यात येत आहे. सदरील फवारणी जंतनाशकाची केली जात असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणी फवारणी...
लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक रहदारी असलेली सार्वजनीक ठिकाणे त्यात बसस्थानक, शिवाजी चौक, रुग्णालय, गंजगोलाई, गर्दीच्या ठिकाणी फवारणी करण्यात येत आहे. उर्वरित शहरात टप्प्याटप्प्याने फवारणी करण्यात येत असल्याचे मनपाच्या सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांनी सांगितले.