Coronavirus : लातूर शहराला आता सात दिवसाला पाणी;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:15 AM2020-03-26T11:15:26+5:302020-03-26T11:18:06+5:30
महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची माहिती
लातूर : जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने नागरिक घरीच आहेत. त्यामुळे अनेक भागातील नागरिकांनी पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे लातूर शहराला मांजरा धरणातून दर 10 दिवसाला पाणी पुरवठा केला जात होता. त्यात बदल करण्यात आला असून, सात दिवसाआड शहरवासीयांना पाणी मिळणार आहे. पाणीपुरवठा करण्याची तयारी मनपाने केली असून, गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
मालमत्ता कर आणि सात दिवसाला पाणी अशा दोन्ही सकारात्मक बाबी असल्या तरी, नागरिकांनी 14 एप्रिलपर्यंत घरीच राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.
मालमत्ता कर भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ...
शहर महानगर पालिकेच्या वतीने मालमत्ता कर भरणा करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात होती. त्यास 31 मार्चपर्यंत मुदत होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार कर भरण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली आहे.
नागरिक कृती समितीद्वारे निर्णयाचे स्वागत...
गेल्या काही दिवसांपासून लातूर शहर महानगरपालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्ती, सिल, अशी कठोर कारवाई सुरु केली होती. मालमत्ता कर आकारणी ही अवाजवी आहे म्हणून सातत्याने समितीने संघर्ष सुरू ठेवला. दरम्यान संपूर्ण जगात कोरोना मुळे नागरिकांच्या जिवन मरणाची लढाई सुरू झाली, या पार्श्वभूमीवर नागरिक हक्क कृती समितीने मालमत्ता कर भरण्यासाठी तीन महिन्याची मुदतवाढ दिल्याने नागरिक कृती समितीच्या वतीने निर्णयाचे स्वागत करण्यात आले. पत्रकावर ऍड. उदय गवारे, बसवंत भरडे, श्रीकांत देशपांडे, विजय चितकोटे, दिनेष गिल्डा, धनंजय चिताडे, अजय कलशेट्टी, रणधीर सुरवसे, हेमंत जाधव विरभद्र वाले, सतीश देशमुख, आंबेसंगे, भालचंद्र कवठेकर, ऍड. शांतीवीर येरटे, अनुप देवणीकर, सुरज भोसले, ऍड. जगदीश शाहबादे, सलीम चौधरी, नयुम शेख, भिमा दुनगांवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.