लातूर आगार! महामंडळाच्या बसेस दुपारनंतर थांबल्या; मराठा आंदोलनाची धग वाढल्याने खबरदारी
By आशपाक पठाण | Published: October 29, 2023 05:06 PM2023-10-29T17:06:00+5:302023-10-29T17:07:05+5:30
अचानक बसेस बंद करण्यात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.
लातूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असून बसेसचे नुकसान होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर आगाराच्या बसेस दुपारी १ वाजेपासून थांबविण्यात आल्या आहेत. अचानक बसेस बंद करण्यात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. तसेच अनेकांनी खाजगी वाहनांचा आधार घेऊन गाव जवळ केले.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने आंदोलन तीव्र केले आहे. गावोगावी खासदार, आमदार, मंत्री, राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली असून गावोगावी साखळी उपोषण, अमरण उपोषणही सुरू करण्यात आले आहे. रविवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलनाची तीव्रता वाढल्याने एस.टी. महामंडळही सतर्क झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बसेस थांबविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
प्रवाशांची उडाली तारांबळ...
दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आगारप्रमुखांना सुरक्षेच्या कारणास्तव बसेस थांबविण्यात याव्यात असा आदेश आल्यामुळे त्यांनी सर्व बसेस चालकांना आपण जिथे आहात त्याच स्थानकात बसेस थांबवाव्यात अशा सूचना दिल्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. आंदोलनाची धग वाढत चालल्याने लांब पल्ल्यासह लोकल फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, प्रवाशांनी खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घेत गाव गाठले. दरम्यान, मराठा आंदोलनामुळे पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे.
बसस्थानाकात शुकशुकाट...
दुपारनंतर बसेस थांबविण्यात आल्याने लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासह गांधी चौक, जुना रेणापूर नाका येथील बसस्थानकात शुकशुकाट होता. बसेस लवकर सोडण्यात येणार नाहीत, अशी माहिती प्रवाशांना देण्यात आल्यावर प्रवासी खाजगी वाहनांच्या थांब्याकडे वळाले.
खबरदारी म्हणून बसेस थांबविल्या...
मराठा आंदोलनाची धग गावोगावी वाढत चालली आहे. रविवारी आंदोलन तीव्र झाल्याने खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार लातूर आगाराच्या सर्व बसेस थांबविण्यात आल्या आहेत. दुपारी १ वाजेपासून कोणत्याही मार्गावर बस सोडण्यात आली नाही, असे विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख यांनी सांगितले.