मानसिक स्वास्थ्यासाठी महिलांचे अंगणवाडीत होणार समुपदेशन!

By हरी मोकाशे | Published: December 14, 2023 06:56 PM2023-12-14T18:56:31+5:302023-12-14T18:56:56+5:30

वन स्टॉप सोलूशन फॉर वुमेन ॲण्ड चाईल्ड उपक्रम

Counseling for women will be held in Anganwadi for mental health! | मानसिक स्वास्थ्यासाठी महिलांचे अंगणवाडीत होणार समुपदेशन!

मानसिक स्वास्थ्यासाठी महिलांचे अंगणवाडीत होणार समुपदेशन!

लातूर : अंगणवाडीतून बालकांना सकस आहाराबरोबर शिक्षण तसेच महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर आता महिलांना शासन योजना व कायद्याचे ज्ञान दिले जाणार आहे. शिवाय, मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलांना सामाजिक, मानसिक व कायदेशीर समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी वन स्टॉप सोल्यूशन फॉर वुमेन ॲण्ड चाईल्ड ही संकल्पना राबविली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजना राबविण्यात येते. या उपक्रमाअंतर्गत शून्य ते ६ वयोगटातील बालके, गर्भवती महिला, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना पूरक पोषण आहार, अनौपचारिक शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भसेवा पुरविल्या जातात. जिल्ह्यात एकूण २ हजार ५९३ अंगणवाड्या असून जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात २ हजार ३२४ आहेत. जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये एकूण १ लाख ७३ हजार बालकांना शिक्षण दिले जाते.

दरम्यान, किशोरवयीन मुली व महिलांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी व त्यांना कौशल्य विकासात प्रशिक्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून अंगणवाड्यांचे वन स्टॉप सोल्यूशन फाॅर वुमेन ॲण्ड चाईल्डमध्ये रुपांतर करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ८७ अंगणवाड्यांची निवड करण्यात आली आहे.

गावातील मुले देणार बालकांना पूर्व शालेय शिक्षण...
वन स्टॉप सोल्यूशन फॉर वुमेन ॲण्ड चाईल्ड उपक्रमाअंतर्गत निवडक ८७ अंगणवाड्यांमध्ये आरोग्य विभागाच्या सहकार्याने सर्व बालकांचे आणि गरोदर मातांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच गरोदर व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यात रक्त, थॉयराईडसह आवश्यक चाचण्या केल्या जाणार आहेत. अंगणवाडीतील बालकांच्या पालकांमार्फत भरडधान्ययुक्त पदार्थ तयार करण्याचा दिवस साजरा केला जाणार आहे. त्यातून भरडधान्याची महत्त्व सांगितले जाणार आहे. बालकांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण करण्यासाठी गावातील वरिष्ठ वर्गातील मुले अंगणवाडीतील बालकांना पूर्व शालेय शिक्षण देणार आहेत.

बौद्धिक वाढीसाठी खेळणीचा उपयोग...
बालकांच्या शारीरिक व बौध्दिक वाढीसाठी अंगणवाडीत पालकांच्या सहभागातून खेळणीचा वापर करण्यात येणार आहे. तसेच बेटी बचाव- बेटी पढाओ योजनेअंतर्गत गुड्डा- गुड्डी फलक दर्शन भागात लावण्यात येणार आहे. त्याअंतर्गत गावात महिनाभरात जन्मलेल्या मुला- मुलींची संख्या फलकावर दर्शविण्यात येणार आहे. आयएसओ संकल्पनेवर आधारित आदर्श बाल शिक्षण केंद्र तयार करण्यात येणार आहे. माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर व स्तनदा मातांना अतिरिक्त पूरक पोषण आहार पुरविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात लवकरच ८७ केंद्रांची निर्मिती...
जिल्ह्यातील बालक व महिलांच्या विकासासाठी सीईओंच्या संकल्पनेतून आरोग्य, ग्रामपंचायत, शिक्षण विभागाच्या सहकार्याने वन स्टॉप सोल्यूशन फॉर वुमन ॲण्ड चाईल्ड हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ९८ केंद्रांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे.
- जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण.

Web Title: Counseling for women will be held in Anganwadi for mental health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.