शेतातील खड्डा बुजविण्याच्या कारणावरुन चुलत भावाचा खुन, चुलता जखमी
By संदीप शिंदे | Published: February 28, 2024 04:43 PM2024-02-28T16:43:16+5:302024-02-28T16:43:57+5:30
पोलिसांनी आराेपी दोन्ही भावंडांना ताब्यात घेतले आहे. नितीन मदन मुळे (वय २७ रा. शिवली ता. औसा) असे मयताचे नाव आहे.
औसा (जि. लातूर) : शेतातील खड्डा बुजविण्याच्या क्षुल्लक कारणावरुन सख्या चुलत भावांमध्ये हाणामारी झाली. त्यात डोक्यात खोऱ्या मारल्याने गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान बुधवारी पहाटे मृत्यू झाला. तर चुलताही जखमी झाला. ही घटना औसा तालुक्यातील शिवली येथे घडली असून, भादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आराेपी दोन्ही भावंडांना ताब्यात घेतले आहे. नितीन मदन मुळे (वय २७ रा. शिवली ता. औसा) असे मयताचे नाव आहे.
औसा तालुक्यातील शिवली येथील फिर्यादी मदन नारायण मुळे व भगवान मुळे हे सख्खे भाऊ असून, ते शेती करुन उपजिविका भागवितात. दोघांच्या शेताला एकच रस्ता असल्याने त्यांच्यात सतत कुरबुरी होत. मंगळवारी आरोपी व्यंकट भगवान मुळे व मोहन भगवान मुळे यांच्या शेतात रास करण्यासाठी मशीन आली होती. रास झाल्यानंतर मशीन जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादीने खड्डा केल्याने रस्ता बंद झाला. त्यामुळे खड्डा बुजविताना फिर्यादी मदन मुळे व त्यांचा मुलगा नितीन मुळे यांनी विरोध केला.
तुम्ही खड्डा बुजवू नका, असे म्हणाले असता चुलत्या-पुतण्यात वाद झाला. यात झालेल्या हाणामारीत आराेपी दोन्ही भावंडांनी संगणमत करुन चुलत भाऊ नितीन मुळे याच्या डोक्यात खोऱ्याने मारुन गंभीर जखमी केले. तसेच चुलत्यालाही मारहाण केली. त्यामुळे या जखमींना लातुरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात गंभीर जखमी झालेल्या नितीन मुळेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचे वडील मदन मुळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी व्यंकट मुळे व मोहन मुळे यांच्याविरुद्ध भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ यांनी दिली.