कोविड केअर सेंटरमध्ये रुचकर भोजनासोबतच रुग्णांची घेतली जातेय काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:20 AM2021-05-18T04:20:51+5:302021-05-18T04:20:51+5:30
सर्वच कोविड केअर सेंटरमध्ये व्यवस्था... जिल्ह्यातील २२ कोविड केअर सेंटरमध्ये एकाच संस्थेकडून भोजन व्यवस्था पुरविली जाते. तालुका स्तरावरही विशेष ...
सर्वच कोविड केअर सेंटरमध्ये व्यवस्था...
जिल्ह्यातील २२ कोविड केअर सेंटरमध्ये एकाच संस्थेकडून भोजन व्यवस्था पुरविली जाते. तालुका स्तरावरही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंपाक तयार करण्याच्या ठिकाणीही योग्य खबरदारी घेतली जाते, तसेच कोविड सेंटरमध्ये भोजन पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एन ९५ मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्याच्या सूचना करण्यात येतात. दररोज नियमित वेळेवर भोजन आणि नाश्त्याचा पुरवठा केला जात आहे.
रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यावर भर...
जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यासोबतच नाश्ता, भोजनाची जबाबदारी पार पाडत आहोत. दर्जेदार आणि चांगली सुविधा देण्यावर आमचा भर आहे. कोविड सेंटरमध्ये ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे वेळेवर भोजन, नाश्त्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे रुग्णांतून समाधान व्यक्त होत आहे. - डॉ.एल.एस. देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक
पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन वसतिगृह
शहरातील पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमध्ये प्रारंभी भोजनाबाबत ओरड होती; मात्र संबंधित यंत्रणेला सूचना दिल्यानंतर सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षभरापासून योग्य पद्धतीने सुविधा पुरविल्या जात आहेत. मध्यंतरी रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने भोजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडला होता; मात्र या काळातही पुरवठादाराने चांगली सेवा पुरविली आहे. येथील रुग्णांनी मिळत असलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
समाजकल्याण वसतिगृह कव्हा रोड लातूर
कव्हा रोडवरील समाजकल्याण वसतिगृहात २०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी महापौर आणि मनपाच्या आरोग्य पथकाने पाहणी करीत भोजनाचा आस्वाद घेतला होता. तेव्हा त्यांनी भोजन आणि नाश्त्याच्या सुविधेबद्दल कौतुक केले हाेते. त्याचप्रमाणे अजूनही चांगली सेवा पुरविली जात आहे. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी दूध आणि पौष्टिक आहाराची सोयही करण्यात आली आहे.
एक हजार मुला-मुलींचे वसतिगृह १२ नंबर पाटी
१२ नंबर पाटी येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या ठिकाणी नोडल अधिकारी, तहसीलदार वेळोवेळी भेट देऊन प्रत्येक बाबीची तपासणी करतात. रुग्णांना दररोज सकाळी नाश्ता, काढा, दुपारी जेवण, ४ वाजता काढा आणि संत्री, मोसंबी, सायंकाळी भोजन दिले जाते. विशेष म्हणजे शहरापासून दूर असूनही या कोविड सेंटरवर लातूर शहरातून वेळेवर सेवा पोहोच केली जाते, हे विशेष आहे.