विनाकारण फिरणाऱ्यांची हडोळतीत कोविड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:21 AM2021-04-23T04:21:25+5:302021-04-23T04:21:25+5:30
हडोळती येथे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांत जनजागृती करण्यात आली. तसेच अत्यावश्यक कामासाठी ...
हडोळती येथे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांत जनजागृती करण्यात आली. तसेच अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांनी चेहऱ्यास मास्क लावावा, अशा सूचना करण्यात आल्या. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. मात्र, काहीजण रस्त्यावर थांबून गप्पा मारत असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली.
आरोग्य कर्मचारी कासले, गायकवाड यांनी ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णवाहिका येथील चौकात आणून विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून ही मोहीम सुरू आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तसेच सूचना केल्या. यावेळी ग्रामसेवक सोमनाथ गिरी, सरपंच शकुंतलाबाई भोगे, उपसरपंच इंदुमतीताई पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप नायने, रामभाऊ मुळके, पिंटू भोंगे, नामदेव कलवले, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या मोहिमेमुळे रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.