मसलगा प्रकल्पाच्या पाळूवर दीडशे फुटाची भेग; सहा दरवाज्यांतून विसर्ग, नागरिकांत भीती

By संदीप शिंदे | Published: September 7, 2024 08:30 PM2024-09-07T20:30:22+5:302024-09-07T20:35:01+5:30

दीडशे फुटाची भेग पडल्याने तलाव फुटेल, या भीतीने परिसरातील गावात भीतीचे वातावरण

Crack near Masalga Medium Project; six doors opened, atmosphere of fear among citizens | मसलगा प्रकल्पाच्या पाळूवर दीडशे फुटाची भेग; सहा दरवाज्यांतून विसर्ग, नागरिकांत भीती

मसलगा प्रकल्पाच्या पाळूवर दीडशे फुटाची भेग; सहा दरवाज्यांतून विसर्ग, नागरिकांत भीती

निलंगा : तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास दीडशे फुटाची भेग पडल्याने तलाव फुटेल, या भीतीने परिसरातील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने शुक्रवारी सहा गेट १० सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

मागील काही दिवसांपासून मसलगा मध्यम प्रकल्पाच्या कारभाराचे धिंडवडे उडत असून, आठ दिवसांपूर्वी तलाव १०० टक्के भरून धोक्याची पातळी ओलांडत असतानाचे फोटो एका शेतकऱ्याने समाज माध्यमातून व्हायरल केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रकल्प प्रशासनाने दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला. ही घटना ताजी असतानाच मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास दीडशे फुटाची लांब भेग पडल्याचे येथील शेतकरी तुळशीदास साळुंके यांच्या निदर्शनास चार दिवसांखाली आली होती. त्यादिवशी भेगेची रुंदी चार इंच इथपर्यंत होती. मात्र तिच भेग शुक्रवारी चार इंचावरून दहा इंचापर्यंत वाढल्याने घाबरून गेलेल्या शेतकरी साळुके यांनी याच ठिकाणी उभारून व्हिडीओ करत चार दिवसांत एवढी मोठी भेग वाढत जात असताना प्रकल्प प्रशासन झोपा काढत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदरील वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरताच तलाव फुटेल या भीतीने ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अमरसिंह पाटील, कार्यकारी अभियंता पवार, उपअभियंता जोजारे यांनी पाहणी करून तातडीने पाणीसाठा कमी करण्याचा निर्णय घेऊन प्रकल्पाचे सहा दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

४० ते ५० टक्क्यांपर्यंत विसर्ग करण्याचे आदेश...
मसलगा मध्यम प्रकल्पातून येत्या काही दिवसांत ४० ते सोळ नाल्याद्वारे मांजरा नदी पात्रात सोडण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचे जोजारे यांनी सांगितले, तर अमरसिंह पाटील यांना विचारले असता गतवर्षी तलावात पाणी उपलब्ध नसल्याने आणि यंदा जोरदार पाऊस होऊन एकदम पाणीसाठा १०० टक्के भरल्याने असा प्रकार घडला असावा किंवा इतर कोणते कारण असावे याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांच्या टीमला पाचारण केले आहे. खबरदारी म्हणून ३० टक्के पाणीसाठा कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाळ्यात पाणीपुरवठा कसा करणार...
मुळात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने असा प्रकार घडत आहे. येथील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यापासून रोजंदारीवरील कामगार देखरेख करत आहेत. अनेक गावांची तहान भागवणारा एवढा मोठा प्रकल्पाची काळजी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गतवर्षी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. आता पाणी सोडून दिल्यानंतर उन्हाळ्यात पाणी पाणी म्हणण्याची वेळ येईल, अशीही तीव्र भावना येथील नागरिकांनी बोलून दाखविली.

Web Title: Crack near Masalga Medium Project; six doors opened, atmosphere of fear among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.