बाजार समितीच्या प्लॉटवर अतिक्रमण करून दमदाटी; माजी नगरसेवकांसह इतरांवर गुन्हा
By हरी मोकाशे | Published: March 18, 2023 07:11 PM2023-03-18T19:11:06+5:302023-03-18T19:11:30+5:30
याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांना २९ वर्षांच्या लीजवर प्लॉट वाटप केले होते. त्या खुल्या असलेल्या चार प्लॉटवर येथील एका माजी नगरसेवकाने आणि इतरांनी अतिक्रमण करून दमदाटी केली. याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने पुण्याच्या पणन संचालकांच्या मान्यतेनुसार सर्व्हे नं. ३०३ (ब) मधील प्लॉटचे वाटप २६ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर बोलीद्वारे करण्यात आले होते. संबंधित व्यापाऱ्यांनी बोलीनुसार रक्कम भरल्यानंतर १२ एप्रिल २०२२ रोजी प्लॉट २९ वर्षांच्या लीज तत्त्वावर देण्यात आले होते. दरम्यान, १४ मार्च २०२३ रोजी बाजार समितीच्या सर्व्हे नंबर ३०३ (ब) मधील व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या प्लॉटवर काहींनी अतिक्रमण केले. तसेच तारेचे कुंपण टाकून सिमेंटची बाकडे ठेवून अतिक्रमण केले. हे व्यापारी आपल्या प्लॉटवर गेले असता त्यांना तेथे येण्यास मज्जाव करण्यात येऊन या ठिकाणी परत येऊ नका, असा दम देण्यात आल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे केली.
त्यानंतर बाजार समितीचे प्रभारी सचिव व इतर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. तेव्हा सदरील जागेवर अतिक्रमण केल्याचे दिसून आले. त्यामुळे बाजार समितीचे प्रभारी सचिव प्रदीप पाटील यांनी शुक्रवारी उदगीर शहर पोलिस ठाण्यात माजी नगरसेवक सुधीर भोसले व इतरांविरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.