लातूरमध्ये वाटमारी करणाऱ्या 'त्या' दाेघांना कत्तीसह अटक
By राजकुमार जोंधळे | Published: March 6, 2023 06:01 PM2023-03-06T18:01:07+5:302023-03-06T18:02:15+5:30
लातूर : शहरातील खाडगाव राेड परिसरात घराकडे जाण्यासाठी थांबलेल्या एकाला दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी जबर मारहाण करत लुटमार केली ...
लातूर : शहरातील खाडगाव राेड परिसरात घराकडे जाण्यासाठी थांबलेल्या एकाला दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी जबर मारहाण करत लुटमार केली हाेती. यातील दाेघांच्या ६ मार्च राेजी पाेलिसांनी कत्तीसह मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात चाैघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी हा घराकडे जाण्यासाठी लातुरातील खाडगाव राेडवर थांबला हाेता. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञातांनी त्यांना जबर मारहाण केली. शिवाय, कत्तीने जिवे मारण्याची धमकी देत खिशातील दहा हजारांची राेकड जबरदस्तीने काढून घेत पसार झाले. ही घटना २८ फेब्रुवारी राेजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरनं. १४८ / २०२३ कलम ३९४, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला. या लुटमारीचा तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले हाेते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांच्यासह पथकाने आराेपींचा शाेध सुरू केला. फिर्यादी पाेलिसांना सांगितलेले वर्णन आणि चेहरापट्टीवरून संशयित म्हणून ऋषिकेश रामकिसन सूर्यवंशी (वय २५) आणि आदित्य राजकुमार धबडगे (वय १८, दाेघेही रा. दादोजी कोंडदेवनगर, लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक कसून चाैकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी पळविलेली दहा हजारांची राेकड, गुन्ह्यात वापरलेली लोखंडी कत्ती पाेलिसांनी जप्त केली आहे. तर फरार झालेल्या अन्य दाेघांचा पोलिस शाेध घेत आहेत. त्यांनाही लवकरच अटक करू, असे पोलिस निरीक्षक गाेरख दिवे म्हणाले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड, सहायक फौजदार सर्जेराव जगताप, अंमलदार भीमराव बेल्लाळे, अर्जुन राजपूत, गोविंद चामे, मयूर मुंगळे, मोतीराम घुले, मन्मथ धुमाळ, निलेश जाधव, राम जाधव यांच्या पथकाने केली आहे.