Crime: १९६५ मध्ये म्हशींची चोरी;आरोपीला तब्बल ५८ वर्षांनंतर अटक
By राजकुमार जोंधळे | Published: September 16, 2023 05:25 AM2023-09-16T05:25:35+5:302023-09-16T05:26:02+5:30
Crime News: १९६५ मध्ये म्हैस चोरल्याच्या प्रकरणाचा तपास आणि आरोपीचा शोध ५८ वर्षे सुरूच होता. शेवटी कर्नाटक राज्यातील बिदर पोलिसांनी गुन्ह्याचा निपटारा करताना, आरोपीला १२ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले.
- दयानंद बिरादार
औराद बाऱ्हाळी (जि.बिदर) : १९६५ मध्ये म्हैस चोरल्याच्या प्रकरणाचा तपास आणि आरोपीचा शोध ५८ वर्षे सुरूच होता. शेवटी कर्नाटक राज्यातील बिदर पोलिसांनी गुन्ह्याचा निपटारा करताना, आरोपीला १२ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. दरम्यान, न्यायालयाने आरोपीचे ७८ वय लक्षात घेऊन जामीन मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी सांगितले, १९६५ मध्ये मेहकर येथील मुरलीधर माणिकराव कुलकर्णी यांच्या दोन म्हशी आणि एक वासरू चोरीला गेले होते. त्यावेळी मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासामध्ये चोरी गेलेले पशुधन उदगीर तालुक्यातील कुणकी येथे सापडले. ते तक्रारदाराकडे सोपविण्यात आले, परंतु गुन्ह्यातील आरोपी गणपती व एका साथीदार आरोपीचा पोलिस शोध घेत होते. त्यावेळी त्यांना अटकही झाली, परंतु ते जामिनावर असताना पुन्हा पसार झाले. त्यांच्या विरोधातील अटक वॉरंट कायम हाेते.
दरम्यान, बिदरचे पोलिस अधीक्षक चलबसवण्णा लंगोटी यांनी प्रलंबित व दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा निपटारा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. याच मोहिमेतील सर्वात जुना गुन्हा समोर आला. १९६५ मध्ये २० वर्षांचा असलेला आरोपी आता ७८ वर्षांचे वृद्ध आजोबा आहेत. त्यांना कायद्याप्रमाणे ताब्यात घेऊन पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या गुन्ह्यातील तक्रारदार मुरलीधर कुलकर्णी, तसेच दुसऱ्या एका आरोपीचे निधन झाले आहे.
कानून के हाथ लंबे होते हैं...
या घटनेची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. पुन्हा एकदा कानून के हाथ लंबे होते हैं, हा डायलॉगही चालवित आहेत. पोलिस दस्ताऐवजातील ५८ वर्षांची नोंद कायम राहिली. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्ह्यांच्या नोंदी वर्षानुवर्षे तपासाचा भाग बनून राहतात, हे लक्षात घेऊन बिदर पोलिस अधीक्षकांनी उघडलेली मोहीम अनेक जुन्या गुन्ह्यांची उकल करत आहे.