नाकाबंदीत सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 06:22 PM2022-07-21T18:22:08+5:302022-07-21T18:23:25+5:30
बॅरेजेसच्या लोखंडी प्लेट्सची चोरी : औराद शहाजानी पोलिसांची कारवाई
- राजकुमार जोंधळे
लातूर : शेळगी (ता. निलंगा) येथे बुधवारी मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद करण्यात आली. यावेळी औराद शहाजानी पोलिसांनी त्यांच्याकडून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी चोरी व घरफोड्या रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी अचानक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार औराद शहाजानी पोलिसांनी १९ जुलैच्या रात्री ११ वाजेपासून २० जुलैच्या मध्यरात्री २ वाजेपर्यंत नाकाबंदी केली. या नाकाबंदीत औराद शहाजानीकडून निलंग्याकडे जाणाऱ्या एका मालवाहू मिनी टेम्पोचा संशय आला. पोलिसांनी टेम्पो थांबवून चौकशी केली. ‘वाहनामध्ये काय आहे?’ असे विचारले असता ज्वारी असल्याचे सांगितले.
पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता वाहनात बॅरेजेसवरील लोखंडी प्लेट असल्याचे दिसून आले. यावेळी पळून जाणाऱ्या संशयित व्यक्तींचा पाठलाग करून एकाला ताब्यात घेण्यात यश आले. त्याची चौकशी केली असता हनुमंत पांडुरंग मोरखंडे (रा. अनंतवाडी, ता. देवणी) असे त्याने नाव सांगितलेले. चोरलेल्या लोखंडी प्लेट हे वांजरखेडा बॅरेजेवरील असल्याचे सांगितले. दरम्यान, विशाल संभाजी पाटील, विकास करण बिराजदार व एक बालक (सर्व रा. कोराळी, ता. निलंगा) येथील असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांनी सहायक पोलीस निरीक्षक संदीप कामत, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे यांची तपास पथके तयार करून पळून गेलेल्या आरोपीच्या मागावर रवाना केले. कासारशिरसी, कोराळी तसेच उमरगा या ठिकाणी आरोपींचा शोध घेऊन त्यांना २४ तासाच्या आत ताब्यात घेण्यात आले.
याबाबत बीट प्रमुखांच्या तक्रारीवरून औराद शहाजानी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून लोखंडी प्लेट, एक टेम्पो, दोन मोटारसायकल असा एकूण सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांनी सांगितले.