निलंगा शहरानजीकच्या शेततळ्यात आढळली मगर, अथक प्रयत्नानंतर पकडण्यात यश
By राजकुमार जोंधळे | Published: February 15, 2024 02:08 AM2024-02-15T02:08:17+5:302024-02-15T02:09:42+5:30
...मगर माेठी असल्याने त्यांना आवरत नव्हती. बऱ्याचदा त्यांच्या हातातून निसटत होती.
निलंगा (जि. लातूर) : शहरातील उदगीर मोड परिसरातील शेतात शेततळ्यामध्ये चक्क ९ फूट लांबीची, २०० किलो वजनाची मगर शेततळ्यात आढळली. त्यास बुधवारी रात्री दहा वाजता वनविभाग, वन जीवरक्षक टीमने पकडून निलंगा येथील वन उद्यानातील तळ्यात ठेवले आहे.
उदगीर मोड परिसरात येथील उद्योजक संजय हालगरकर यांच्या शेतात शेततळे असून, बुधवारी दुपारी शेतात काम करणारे कासिम शेख यांना पाण्यात काहीतरी मोठा प्राणी असल्याचा संशय आला. यावरून त्यांनी वन जीवरक्षक टीमशी संपर्क साधला. जवळपास दोन तासांच्या निरीक्षणानंतर मगर असल्याचे वन जीवरक्षक टीमच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने वनविभागाला पाचारण केले. दुपारी तीन वाजल्यापासून शेततळ्यातील पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला. चार तासानंतर मगरीचे दर्शन झाले. अवाढव्य मगरीला बघून भीती वाटली. घटनास्थळावर बघ्यांनी मोठी गर्दी केली हाेती. निलंगा येथील ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी.आर. शेजाळ, विनोद हेबाडे, गुंडेराव सूर्यवंशी, बुलबुले यांचे पथकही दाखल झाले. सायंकाळी आठ वाजतापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. रात्री दहा वाजता अथक प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात यश आले.
यावेळी वन्यजीव रक्षक मित्र प्रमोद पुरी, भीमाशंकर गाढवे, सिद्धार्थ चव्हाण, अमोल माने, हनुमंत पाटील, गणेश देशमुख, शुभम पाटील, मुजम्मिल सित्तारी, वाहेब सितारी, विकास कांबळे, वनरक्षक सोपान बडगणे, वनसेवक चक्रधर तेलंग, ज्ञानदेव जाधव, पिराजी पिटले, काळू तेलंग, आदिनाथ रोड्डे आदींनी मगरीला पकडले. शिवसेनेचे ईश्वर पाटील यांनीही रेस्क्यू ऑपरेशनसाठी मदत केली.
दाेन तासांच्या प्रयत्नानंतर मगरीला दाेरीने बांधण्यात यश -
मगर मोठी असल्याने दहा ते बारा जणांनी प्रयत्न करून तिला दाेर बांधला; मात्र मगर माेठी असल्याने त्यांना आवरत नव्हती. बऱ्याचदा त्यांच्या हातातून निसटत होती. शेततळ्यातून वाहनापर्यंत घेऊन जाताना दोन ते तीन वेळेला तोल गेला; मात्र वन जीवरक्षक टीमने मगरीला पकडून नेले. विशेष म्हणजे, या शेततळ्यालगत नवीन वसाहत असून, वेळीच प्रसंगावधानाने मगरीला पकडण्यात आल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला.