एक रुपयाच्या पीकविम्याची कमाल; पेरा ३ लाख हेक्टरवर, विमा ४ लाख २९ हजार हेक्टरचा
By हरी मोकाशे | Published: December 25, 2023 01:11 PM2023-12-25T13:11:41+5:302023-12-25T13:12:23+5:30
यंदापासून शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम केवळ एक रुपया केल्याने शेतकऱ्यांचा पीकविमा भरण्याकडे कल वाढला आहे.
लातूर : पीकविम्याच्या रकमेचा शेतकऱ्यांवर अधिक भार पडू नये म्हणून शासनाने केवळ एक रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे. चालू रब्बी हंगामात ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर पेरा झाला असला तरी प्रत्यक्षात पीकविमा ४ लाख २९ हजार ९९ हेक्टरचा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे एक रुपयाच्या पीकविम्याची कमाल अन् रब्बी हंगामाच्या क्षेत्रवाढीची धमाल झाली आहे.
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीइतका पाऊस झाला नाही. परिणामी, नदी-नाले वाहिले नाहीत. ओढेही खळाळले नाहीत. मध्यम प्रकल्पासह तलाव, विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात पेरा कमी होईल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, त्यापेक्षा अधिक प्रमाणात पेरा झाला आहे. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८० हजार हेक्टर आहे. आतापर्यंत ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर पेरा झाला आहे. त्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झाला असून, तो २ लाख ७१ हजार ४६२ हेक्टर झाला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. यंदापासून शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम केवळ एक रुपया केल्याने शेतकऱ्यांचा पीकविमा भरण्याकडे कल वाढला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा
पीक - पेरा (हेक्टरमध्ये)
ज्वारी - ३२५५७
गहू - ८९६२
मका - १५८१
हरभरा - २७१४६२
करडई - १६०८३
जवस - ९९
सूर्यफूल - ४५
एकूण - ३३१६३०
५ लाख ३६ हजार १३८ शेतकऱ्यांनी भरला विमा
जिल्ह्यातील ५ लाख ३६ हजार १३८ शेतकऱ्यांनी रब्बीतील हरभरा, ज्वारी अणि गहू या तीन पिकांचा हप्ता भरला आहे. विमा रकमेपोटी ५ लाख ३६ हजार १३६ रुपयांचा भरणा करीत ४ लाख २९ हजार ९९ हेक्टर क्षेत्राचे संरक्षण केले आहे. शेतकऱ्यांच्या हिश्श्यापोटी राज्य शासन ९२ कोटी ९१ लाख ११ हजार ९५३ रुपयांचा भरणा करणार आहे. तसेच केंद्र शासनाला ७० कोटी २ लाख ८ हजार ९०७ रुपयांचा भरणा करावा लागणार आहे.
एक लाख हेक्टरची तफावत
जिल्ह्यात रब्बीतील सात पिकांची एकूण ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर पेरणी झाली असली तरी केवळ तीन पिकांचा विमा ४ लाख २९ हजार ९९ हेक्टरचा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे १ लाख १६ हजार ११८ हेक्टर क्षेत्राची तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागासही धक्काच बसला आहे. दरम्यान, अंतिम पेरणी अहवालानंतर नेमके पेरणी क्षेत्र समजेल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
कृषी विभागही गोंधळात
जिल्ह्यात पेरणीच्या तुलनेत १ लाख १६ हजार हेक्टरवर अधिक पीकविमा उतरविण्यात आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयही गोंधळात पडले आहे. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे म्हणत कानावर हात ठेवले.
अवकाळी पावसामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले
अल्प पर्जन्यमानामुळे जमिनीत ओलावा नव्हता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी करण्याचे टाळले होते. दरम्यान, अवकाळी पाऊस झाल्याने पेरणी केली. तसेच ऊस कारखान्यास गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस मोडून रब्बीचा पेरा केला. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.