सर्व मंडळातील पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के आगाऊ रक्कम

By हरी मोकाशे | Published: September 1, 2023 08:23 PM2023-09-01T20:23:06+5:302023-09-01T20:23:22+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : महिनाभरापासून पावसाच्या खंडामुळे नुकसान

Crop insurance holders in all circles will get 25 percent advance amount | सर्व मंडळातील पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के आगाऊ रक्कम

सर्व मंडळातील पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के आगाऊ रक्कम

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीपातील पिके करपू लागली आहेत. त्यामुळे उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिकची घट झाली असून नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा हतबल झाला आहे. हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणाच्या अहवालावरुन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच महसूल मंडळातील सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश शुक्रवारी पीकविमा कंपनीस दिले आहेत.

जिल्ह्यात यंदा उशिरा पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला. जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला असून तो ९८ टक्के आहे. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे, तर ८८ हजार ७४६ हेक्टरवर तूर, उडीद, मुग, ज्वारी, बाजरी, मका, कापूस व अन्य पिकांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३४०.६ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, जुलै अखेरपासून पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी, खरीपातील पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिकची घट झाली आहे.

दरम्यान, पावसाने खंड दिल्यामुळे विविध संघटनांसह, पक्षांच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यासह २५ टक्के आगाऊ पीकविमा देण्याची मागणी केली होती. तसेच लाेकमतमधून सविस्तर वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हास्तरीय आढावा समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या आदेशानुसार हंगाम मध्य परिस्थितीचे सर्वेक्षण कृषी विभागाचे अधिकारी- कर्मचारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी व स्थानिक शेतकऱ्यांनी केले. त्यात अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी सोयाबीन या पिकास संभाव्य नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम पीकविमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी, पुणे यांना दिले आहेत.

२५ टक्के भरपाई मिळणारी महसूल मंडळे...

जिल्ह्यातील ६० पैकी ६० महसूल मंडळात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान आहे. त्यात गातेगाव, कासारखेडा, लातूर, मुरुड, तांदुळजा, बाभळगाव, हरंगुळ बु., चिंचोली बु., कन्हेरी, औसा, भादा, किल्लारी, लामजना, मातोळा, किणी थोट, बेलकुंड, उजनी, अहमदपूर, खंडाळी, किनगाव, शिरुर ताजबंद, हडोळती, अंधोरी, अंबुलगा बु., औराद शहाजानी, कासार बालकुंदा, कासारशिरसी, निलंगा, मदनसुरी, पानचिंचोली, निटूर, भुतमुगळी, हलगरा, मोघा, हेर, उदगीर, वाढवणा बु., देवर्जन, नागलगाव, नळगीर, तोंडार, कारेपूर, पोहरेगाव, रेणापूर, पानगाव, पळशी, चाकूर, वडवळ नागनाथ, नळेगाव, शेळगाव, झरी बु., आष्टा, शिरुर अनंतपाळ, हिसामाबाद, साकोळ, जळकोट, घोणसी, वलांडी, देवणी, बोरोळ या ६० मंडळातील सोयाबीन उत्पादकांना आग्रीम मिळणार आहे.

महिनाभरात भरपाई देण्याचे आदेश...
जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला असून पावसाच्या खंडामुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिकची उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीस सोयाबीन उत्पादकांना २५ टक्के आग्रीम द्यावी. ही आग्रीम महिनाभरात पीकविमा धारकांच्या खात्यावर जमा करावी, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

- शिवसांब लाडके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.

 

Web Title: Crop insurance holders in all circles will get 25 percent advance amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.