अत्यावश्यक वस्तूंच्या नावाखाली नागरिकांची बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:20 AM2021-04-27T04:20:08+5:302021-04-27T04:20:08+5:30

अहमदपूर : विकेंड लॉकडाऊनंतर सोमवारी शहरातील बाजारपेठेत भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबडच उडाली होती. काही जणांच्या ...

Crowds of citizens in the market in the name of essential commodities | अत्यावश्यक वस्तूंच्या नावाखाली नागरिकांची बाजारात गर्दी

अत्यावश्यक वस्तूंच्या नावाखाली नागरिकांची बाजारात गर्दी

Next

अहमदपूर : विकेंड लॉकडाऊनंतर सोमवारी शहरातील बाजारपेठेत भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबडच उडाली होती. काही जणांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. शिवाय, फिजिकल डिस्टन्सही राखला जात नव्हता. शासन नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे पहावयास मिळाले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळत असला तरी सोमवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर नेहमीपेक्षा अधिक गर्दी दिसून येत होती. भाजीपाला, किराणा साहित्याचा बहाणा करुन काहीजण घराबाहेर पडल्याचे आढळून आले.

शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही नागरिक, व्यापाऱ्यांकडूनही शासन नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पहावयास मिळाले. काही जणांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसून येत नव्हता. तसेच भाजीपाला, फळविक्रेतेही विनामास्क विक्री करीत होते. पथकातील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी केली असता विविध कारणे सांगण्यात येत होते. त्यामुळे पथकातील कर्मचारीही हतबल होत असल्याचे पहावयास मिळाले. मात्र, ज्यांच्या चेहऱ्यावर मास्क दिसून येत नाही, अशांवर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न सुरु होते.

गत आठवड्यात प्रशासनाने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड चाचणी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काही प्रमाणात पायबंद बसला होता. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारची चाचणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांना दंड...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी शासन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी नगरपालिकेने पथक नियुक्त केले आहे. हे पथक शहरात सकाळपासून पोलीस प्रशासनाच्या मदतीने

विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहे, असे पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.

आझाद चौकात पुन्हा कोंडी...

शहरातील आझाद चौकातून भाजी मार्केट, जुने शहर आणि अन्य ठिकाणी रस्ते जातात. या चौकात भाजीपाला, किराणा साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होती. शहरातील अन्य चौकात मात्र कामानिमित्ताने काही नागरिक असल्याचे पहावयास मिळाले. येथील आझाद चौकात दररोज पथक नियुक्त करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Crowds of citizens in the market in the name of essential commodities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.