कावळ्यांचा मृत्यू ना बर्ड फ्ल्यू,ना मानमुडीने! चार दिवसांत ४२ कावळे दगावल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:08 IST2025-01-17T14:06:56+5:302025-01-17T14:08:00+5:30
प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त : प्रशासन, नागरिकांना मिळाला दिलासा

कावळ्यांचा मृत्यू ना बर्ड फ्ल्यू,ना मानमुडीने! चार दिवसांत ४२ कावळे दगावल्याने खळबळ
लातूर : अचानकपणे कावळे दगाविण्याच्या घटनेमुळे उदगिरात भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. दरम्यान, मृत कावळ्यांच्या वैद्यकीय नमुन्यांचा तपासणी अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून तो बर्ड फ्लू आणि मानमुडी निगेटिव्ह आहे. त्यामुळे धास्ती कमी झाली असली तरी कावळ्यांचा मृत्यू विषारी द्रवामुळे की सडलेले खाल्ल्याने झाला, याचा शोध पशुसंवर्धन विभाग घेत आहे.
उदगिरात सोमवारी अचानकपणे २८ कावळे मृतावस्थेत आढळले, तसेच मंगळवारी ८, तर बुधवारी ५ कावळे मृतावस्थेत आढळले. त्याची दखल घेत पशुसंवर्धन विभागाने मृत कावळ्याचे वैद्यकीय नमुने पुणे-औंध येथील राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेकडे पाठविले. दरम्यान, मयत कावळ्यांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली, तसेच उदगीर तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या. प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लक्ष लागून होते.
आणखीन एक कावळा दगावला
उदगिरात गुरुवारी आणखीन एक कावळा दगावला आहे. मयत कावळ्यांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. दरम्यान, उपाययोजनेसाठी जिल्हास्तरावर शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे.
बर्ड फ्लू निगेटिव्हमुळे चिंता दूर
औंध-पुणे येथील राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाला असून बर्ड फ्लू आणि मानमुडी निगेटिव्ह आहे. त्यामुळे चिंता कमी झाली आहे. कारण बर्ड फ्लू पॉझिटिव्ह अहवाल आला असता तर अधिक काळजी घ्यावी लागली असती. शिवाय, हा आजार माणसांमध्येही पसरण्याची भीती असते, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी सांगितले.
विषबाधा, विषाणूंचा आजार...?
विषारी औषध अथवा सडलेले खाल्ल्यामुळे कावळ्यांचा मृत्यू झाला का, हे प्रयोगशाळेत तपासले जात आहे. अहवालानंतर कावळ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजून येईल. दरम्यान, उदगीर पालिकेस स्वच्छतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
- डॉ. श्रीधर शिंदे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन.