लातुरात बसने चिरडले; दुचाकीचालक जागीच ठार, गुळ मार्केट चाैकातील घटना
By राजकुमार जोंधळे | Updated: October 31, 2024 20:41 IST2024-10-31T20:40:48+5:302024-10-31T20:41:12+5:30
निलंगा आगाराच्या शिवशाही बसने एका दुचाकी चालकाला चिरडल्याची घटना गुळ मार्केट चाैकात गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला.

लातुरात बसने चिरडले; दुचाकीचालक जागीच ठार, गुळ मार्केट चाैकातील घटना
लातूर : निलंगा आगाराच्या शिवशाही बसने एका दुचाकी चालकाला चिरडल्याची घटना गुळ मार्केट चाैकात गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. जाफर युसूफ सय्यद (वय ५९ रा. आलमपुरा, शाम नगर, लातूर) असे मयत दुचाकीचालकाचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकातून निलंग्याकडे निघालेली शिवशाही बस (एम.एच. ०६ बी.डब्ल्यू. ०८९६) लातुरातील गुळमार्केट चाैकात गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आली. यावेळी दुचाकीवरुन (एम.एच. २४ बी.बी. २७७५) निघालेल्या जाफर युसूफ सय्यद यांची दुचाकी बसच्या समाेरील चाकाखाली आली. यामध्ये दुचाकीचालक जाफर सय्यद हे बसने चिरडल्याने जागीच ठार झाले. घटनास्थळी गांधी चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वाेपचार रुग्णालयातील डाॅ. विजय होळे यांच्या माहितीवरुन आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. अशी माहिती पाेलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी दिली.
चाैकात गाेंधळाची स्थिती; अपघाताच्या घटनात वाढ...
लातूर शहरातील चाैका-चाैकामध्ये बेशिस्त वाहनधारकांमुळे गाेंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र कायम आहे. सिग्नल पडण्यापूर्वीच अनेक वाहनधारक भरधावपणे निघून जातात. परिणामी, अचानकपणे घुसलेल्या बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतुकीचा खाेळंबा हाेत आहे. अशा वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज असून, केवळ बेशिस्तपणामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ हाेत असल्याचे समाेर आले आहे.