युनिपोलवरील जाहिरात दिसण्यासाठी वृक्षतोड; लातूर मनपाकडून कंत्राटदाराला नोटीसचा सोपस्कार

By हणमंत गायकवाड | Published: May 20, 2024 06:28 PM2024-05-20T18:28:46+5:302024-05-20T18:29:35+5:30

 बोर्डाच्या आकाराचे वारंवार उल्लंघन : मनपाला उत्पन्न मिळते तरी किती?

Cutting down trees to display advertisements on Unipole; formality of sending notice to contractor by Latur Municipality | युनिपोलवरील जाहिरात दिसण्यासाठी वृक्षतोड; लातूर मनपाकडून कंत्राटदाराला नोटीसचा सोपस्कार

युनिपोलवरील जाहिरात दिसण्यासाठी वृक्षतोड; लातूर मनपाकडून कंत्राटदाराला नोटीसचा सोपस्कार

लातूर : युनिपोलवरील जाहिरात दिसण्यास अडथळा ठरणाऱ्या दोन झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली असून, एका झाडाच्या फांद्या तोडल्याचा पराक्रम लातूर शहरात झाला आहे. मिनी मार्केट परिसरातील एका युनिपुलजवळील दोन झाडे तोडली; तर लोकमान्य टिळक चौकातील युनिपोलवरील जाहिरात दिसण्यास अडथळा ठरत असलेल्या एका झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. या प्रकरणी महानगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराला केवळ नोटीस दिली आहे. समाधानकारक खुलासा कंत्राटदाराकडून आला नसतानाही कारवाई केली नाही. दरम्यान, ‘लोकमत’ने हा प्रश्न ऐरणीवर घेतल्यानंतर दुसरी नोटीस पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

मुंबई घाटकोपर येथील घटनेत १४ लोकांचा बळी होर्डिंगमुळे गेला. अनेकजण जखमी झाले. या पार्श्वभूमीवर लातूर महापालिकेने तीव्रतेने कारवाई करायला हवी. मात्र गती दिसत नाही. मिनी मार्केट परिसरातील युनिपोलची जाहिरात दिसत नसल्यामुळे दोन वृक्षांची कत्तल करण्यात आली. कसलीही परवानगी घेतलेली नाही. सोपस्कार म्हणून केवळ नोटीस पाठविण्यात आली आहे. इकडे ग्रीन लातूर वृक्ष टीम वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी मेहनत घेते आहे. त्यांनी पाणी घालून जगवलेल्या वृक्षांवर जाहिरात दिसत नाही; म्हणून कुऱ्हाड चालवली आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

युनिपोलची साइझ दहा बाय वीस; उल्लंघन झाल्याच्या अनेक तक्रारी
दहा बाय वीसचे युनिपोल उभारण्यात यावेत. यापेक्षा जास्त आकाराचे उभारण्यात येऊ नयेत, असे महापालिकेसोबत झालेला करारात नमूद आहे. मात्र त्याचे ठिकठिकाणी उल्लंघन झालेले दिसते. बारा ते तेरा ठिकाणी युनिपोल आहेत. बहुतांश ठिकाणी साइझचे उल्लंघन आहे. सामाजिक संस्थेने पाणी घालून जगवलेल्या झाडावर कुऱ्हाड चालवली, तिथे साइझचे काय असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

थकबाकी वसूल करून कारवाई काय करणार?
होर्डिंगधारकांकडे २८ लाख ९३ हजार ९९६ रुपये बाकी आहे. होर्डिंगच्या प्रमुख तीन एजन्सींकडून १९ लाख ५७ हजार पाचशे रुपयांची जाहिरात शुल्काची वसुली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे २८ लाख ९३ हजार ९९६ रुपयांची थकबाकी आहे. एप्रिल २०१९ ते मार्च २०२३ पर्यंतची वसुली व थकबाकी आहे. ३६१ अनधिकृत होर्डिंग शहरात आहेत. आता त्यांच्याकडून थकबाकी वसूल केली जाणार आहे की फक्त होर्डिंग काढून कारवाई केली जाणार आहे, हे महापालिकेने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

Web Title: Cutting down trees to display advertisements on Unipole; formality of sending notice to contractor by Latur Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.