लातूर मनपाकडून दैनंदिन १८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 06:35 PM2019-01-21T18:35:46+5:302019-01-21T18:41:05+5:30
भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता काटकसरीचा हा प्रयोग मनपाने गेल्या महिनाभरापासून सुरू ठेवला आहे.
- हणमंत गायकवाड
लातूर : व्यावसायिक व इतर मागणी तसेच योजनेतील तूट गृहित धरता १०० लिटर दरडोई प्रमाणे ६८ द.ल.ली. पाण्याची शहराला गरज आहे. त्यानुसार ६८ दलली.ची मागणी असली, तरी प्रत्यक्षात ५० दलली. पाणी मांजरा प्रकल्पातून लातूर शहराला उचलले जाते. साधारणपणे १८ द.ल.ली. पाणी कमी उचलून बचत केली जात आहे. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता काटकसरीचा हा प्रयोग मनपाने गेल्या महिनाभरापासून सुरू ठेवला आहे. या सूत्रानुसार जून अखेर पाणी पुरेल, असा विश्वास मनपा प्रशासनाला आहे.
नागरिकांकडून अंदाज ३० टक्के पाण्याचा अपव्यय होतो. ११.५० द.ल.ली. अपव्यय आहे. तो टाळण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मांजरा प्रकल्पात सध्या ३१.७० दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. या पाणी साठ्याचा वापर काटकसरीने मनपाने सुरू केला आहे. १८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत दररोज केली जात आहे. मागणी ६८ दशलक्ष लिटरची असताना ५० दशलक्ष लिटर पाणी दररोज उचलले जात आहे. पाणी गळतीवरही मनपाचा कटाक्ष असून, ११.५० दशलक्ष लिटर दररोजचा होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मनपाने पावले उचलली आहेत.
धनेगाव ते हरंगुळ दरम्यानच्या ५० कि.मी. लांबीच्या गुरुत्ववाहिनीवरील गळत्या, अनधिकृत नळ बंद करण्यात येत आहेत. जलशुद्धीकरण केंद्राच्या बॅकवॉशचे वाया जाणाऱ्या ८ ते १० लाख लिटर पाण्याची बचत केली जात आहे. वितरण व्यवस्थेच्या पाईपलाईनवरील गळत्या बंद करुन अमृत योजने अंतर्गत जलकुंभाची व्हॉल्वही बदलण्यात आली आहे.
२० दशलक्ष लिटर पाणी बचतीचा प्रयत्न...
शहराची लोकसंख्या ५ लाख आहे. या लोकसंख्येला दरडोई १०० लिटर पाण्याची गरज लक्षात घेता मागणी ६८ दशलक्ष लिटर आहे. परंतु, लातूर मनपाने मागणीमध्ये १८ दशलक्ष लिटरची बचत, अपव्यय टाळून ५ दशलक्ष लिटर वापरासाठी पाणी उपयोगात आणणे, कॅशबॅकमधून ८ ते १० लाख लिटर पाण्याची बचत केली जात आहे. तथापि, ५० पेक्षा कमी ४८ दशलक्ष लिटर पाण्यावर ५ लाख लोकसंख्येच्या शहराची तहान भागविण्याचा प्रयत्न सध्या प्रशासनाकडून केला जात आहे. या उपाययोजनेमुळे सात दिवसांआड शहराला पाणी पुरवठा करणे प्रशासनाला शक्य होत आहे.
नळांना मीटर बसविण्याची निविदा अंतिम टप्प्यात...
लातूर शहरातील सर्व नळांना वॉटर मीटर बसविण्यासाठी महानगरपालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्यातील निविदा मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय, जलमापक खाजगी पुरवठादाराकडून बसवून घेण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. मनपाच्या या उपाययोजनेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा प्रशासनाची आहे.