चिंचेच्या झाडाचे नुकसान; एकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:24 AM2021-07-07T04:24:46+5:302021-07-07T04:24:46+5:30
क्षुल्लक कारणावरून एकाला मारहाण लातूर : क्षुल्लक कारणावरून एकाला चौघांनी जबर मारहाण केल्याची घटना लातूर येथे शनिवारी घडली. याबाबत ...
क्षुल्लक कारणावरून एकाला मारहाण
लातूर : क्षुल्लक कारणावरून एकाला चौघांनी जबर मारहाण केल्याची घटना लातूर येथे शनिवारी घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, यशोधन केशवराव कातळे (रा. गरसोळी, ता. रेणापूर) हा आपल्या मित्रासोबत बोलत बसला होता. दरम्यान, मनोज धोत्रे याच्यासह अन्य तिघा जणांनी संगनमत करून फिर्यादीस लोखंडी कत्तीने मारहाण केली. शिवाय, दोघांनाही जिवे मारू, अशी धमकी दिली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मारहाणप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा
लातूर : घरासमोरून जात असताना शिव्या दिल्याच्या कारणावरून विचारणा केली असता एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना भंडारवाडी येथे शनिवारी घडली. याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी ज्ञानोबा रामकिशन आलापुरे (४१, रा. भंडारवाडी) यांच्या घरासमोरून शिव्या देत जात असताना तुम्ही माझ्या घराकडे बघून शिव्या का देता, अशी विचारणा केली असता विष्णू शिवाजी मामडगे याच्यासह अन्य तिघांनी संगनमत करून लाथा-बुक्क्यांनी, बेल्टने मारहाण केली. मोटारसायकलवर दगड मारून नुकसान केले. याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी काढण्यावरून चाकुरात मारहाण
लातूर : बसस्थानक परिसरात ऑटो थांबवून बोलत असताना समोर दुचाकी थांबविली. आम्हाला पुढे जायचे आहे, मोटारसायकल काढा, असे म्हणाले असता पाच जणांनी मारहाण केल्याची घटना चाकूर येथे घडली. याबाबत चाकूर पोलिसांत गुन्हा नोंद आहे. फिर्यादी विवेक राजेश्वर डुमणे (२५, रा. लातूर रोड, ता. चाकूर) हे त्यांच्या दुकानचे साहित्य ऑटोत ठेवले होते. तो ऑटो बसस्थानकात थांबविण्यात आला होता. यावेळी समोरून थांबविण्यात आलेली दुचाकी काढा, असे म्हटले असता महेश साळुंके याच्यासह अन्य चौघांनी फिर्यादी व त्यांच्या वडिलास शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना रविवारी घडली. याबाबत गुन्हा नोंद आहे.
गुराळ पाटी येथून दुचाकी पळविली
लातूर : गुराळ पाटी परिसरात थांबविण्यात आलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना शनिवारी घडली. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी गणेश शेषराव जगताप (३५, रा. बेंडगा, ता. निलंगा) यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच २४ एन २५१५) गुराळ पाटी परिसरात थांबविली होती. दरम्यान, ती अज्ञात चोरट्यांनी शनिवारी पळविली. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्त्यात अडथळा; दोघांविरुद्ध गुन्हा
लातूर : घरासमोरील नारळाच्या झाडाखाली बाज टाकल्याने वाहतुकीला अडचण झाली. याबाबत तुमची बाज बाजूला काढा, असे म्हणाले असता एकास दोघांनी मारहाण केल्याची घटना कोळपा येथे रविवारी घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी नागनाथ विठ्ठलराव चिंतले (४०, रा. कोळपा, ता. लातूर) हे ऑटो घेऊन घराकडे निघाले होते. दरम्यान, वाटेत टाकण्यात आलेली बाज बाजूला घ्या, असे म्हणाले असता बालाजी भगवान सिरगिरे याच्यासह अन्य दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत विवेकानंद चौक पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
क्षुल्लक कारणावरून चाकुरात मारहाण
लातूर : क्षुल्लक कारणावरून फिर्यादीसह चुलत भावाला मारहाण केल्याची घटना रविवारी चाकूर येथे घडली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी नितीन बालाजी साळुंके (२२, रा. चाकूर) हे त्यांच्या चुलत भावास मोटारसायकलवरून सोडण्यासाठी जात होते. दरम्यान, अंतेश्वर सोनटक्के याच्यासह अन्य चौघांनी हाताला ओढून मोटारसायकलवरून पाडले. यावेळी फिर्यादी व चुलत भावास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंद केला आहे.
शेतीच्या कारणावरून कुऱ्हाडीने मारहाण
लातूर : शेतीच्या कारणावरून काठी आणि कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केल्याची घटना शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अजनी येथे घडली. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात चौघांविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी शरद गोरोबा शिंदे (३५, रा. अजनी) यांच्या आई-वडिलास तुम्ही आमच्या लेकरांना शेतात का जाऊ दिले नाही, तुमच्या बापाचे शेत आहे का, असे म्हणून फिर्यादीसह आई-वडील आणि भावास शहाजी शिंदे याच्यासह अन्य तिघांनी संगनमत करून काठी आणि कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले. ही घटना १ जुलै रोजी घडली. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उदगीर-अहमदपूर महामार्गाची दुरवस्था
लातूर : जिल्ह्यातील नांदेड-बीदर महामार्गावरील उदगीर-अहमदपूरदरम्यान रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हा महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना जोडणारा आहे. नांदेड ते तोगरीपर्यंत या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. महामार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्रस्त वाहनधारक, स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
प्रवासी निवारा उभारण्याची मागणी
लातूर : नांदेड-बीदर महामार्गावरील वाढवणा पाटी येथे प्रवासी निवाऱ्याची उभारणी करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांतून होत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. पूर्वी येथे प्रवासी निवारा होता. तो पाडण्यात आला. मात्र, पुन्हा नव्याने येथे निवारा उभारण्यात आला नाही. परिणामी, वाढवणा, मन्ना उमरगा, किनी यल्लादेवी, केसगीरवाडी, डांगेवाडी, डाऊळ, खेर्डा, हिप्परगा, बेळसांगवी, सुकणी, वाढवणा (खु.) परिसरातील प्रवाशांची हेळसांड होत आहे.