शेती पिकांचे नुकसान; नदीवरील पुलावरून पावसाचे पाणी, वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 08:38 AM2022-10-15T08:38:28+5:302022-10-15T08:46:30+5:30
वाहतूक ठप्प : शेती पिकांना बसला फटका
किनगाव (जि. लातूर) : किनगावसह परिसरात शुक्रवार दुपारी जवळपास एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेत- शिवारातून पाणीच पाणी वाहत होते. दरम्यान, खानापूर नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने किनगाव- लातूर मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
किनगावहून लातूरला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग हा कारेपूर मार्गे आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ असते. किनगावजवळील खानापूर नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. शुक्रवारी दुपारी या भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले. परिणामी, काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणारे वाहनधारक पर्यायी मार्गाचा अवलंब करीत असल्याचे पहावयास मिळाले. या पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुुळे पुलाची उंची वाढवून दुरुस्ती करण्यात यावी, अशी या भागातील नागरिक, वाहनधारकांकडून सातत्याने मागणी होत आहे.
यापूर्वीही झाली होती वाहतूक ठप्प...
यापूर्वीही ९ जुलै रोजी मोठा पाऊस झाल्याने चार ते पाच तास पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. हा पूल जुना असून पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलावरून कमी प्रमाणात पाणी वाहताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, छोटे- मोठे अपघात घडत आहेत. पुलाची उंची वाढवून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.