सततच्या पावसाने टोमॅटोचे नुकसान, शेतकरी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:14 AM2020-09-27T11:14:58+5:302020-09-27T11:15:44+5:30
एका एकरात बाराशे ते दीड हजार कॅरेटपर्यंत टोमॅटोचे उत्पादन मिळत असे़. परंतु सततच्या पावसामुळे आता एकरी केवळ ३०० ते ४०० कॅरेट टोमॅटो निघत आहेत. त्यामुळे लागवडीसाठीचा खर्चही निघत नाही. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वारंवार फवारणी करावी लागत आहे, असे टोमॅटो उत्पादक यांनी सांगितले़
किनगाव : सततच्या पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊन रोपांना लगडलेले टोमॅटो गळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़. एका शेतकऱ्याने टोमॅटो लागवड करुन आतापर्यंत ६० हजारांचा खर्च केला़. मात्र, पदरी केवळ २० हजारांचेच उत्पादन पडले आहे़. परिणामी, भाजीपाला उत्पादक संकटात सापडले आहेत़.
अहमदपूर तालुक्यातील किनगाव व परिसरातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांपेक्षा भाजीपाला उत्पादनावर अधिक भर देतात़. किनगाव मंडळात जवळपास ७० ते ८० हेक्टरवर टोमॅटोची लागवड केली जाते़. मात्र, वातावरणात बदल होऊन सततच्या पावसामुळे टोमॅटोवर करपा व अन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़. त्यामुळे टोमॅटो रोपांची मुळे नासत असून रोपे उन्मळून पडत आहे. त्याचबरोबर रोपांना लागलेले टोमॅटोही गळून पडत आहेत़
एका एकरात बाराशे ते दीड हजार कॅरेटपर्यंत टोमॅटोचे उत्पादन मिळत असे़. परंतु सततच्या पावसामुळे आता एकरी केवळ ३०० ते ४०० कॅरेट टोमॅटो निघत आहेत. त्यामुळे लागवडीसाठीचा खर्चही निघत नाही. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वारंवार फवारणी करावी लागत आहे, असे टोमॅटो उत्पादक बालाजी पवार यांनी सांगितले़
सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव व वातावरणातील आर्द्रतेत वाढ झाल्याने बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे़. शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा होईल, अशी सोय करावी़, बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला कृषी पर्यवेक्षक एस. बी. तांदळे यांनी दिला़