करप्यामुळे नुकसान, शेतकऱ्यांनी फेकले रस्त्याच्या बाजूला टोमॅटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:24 AM2021-08-13T04:24:08+5:302021-08-13T04:24:08+5:30

वडवळ (नागनाथ) : पावसाने दिलेला ताण आणि त्यातच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे टोमॅटो पिकास मोठा फटका बसला आहे. झाडास ...

Damaged by taxes, farmers throw tomatoes on the side of the road | करप्यामुळे नुकसान, शेतकऱ्यांनी फेकले रस्त्याच्या बाजूला टोमॅटो

करप्यामुळे नुकसान, शेतकऱ्यांनी फेकले रस्त्याच्या बाजूला टोमॅटो

Next

वडवळ (नागनाथ) : पावसाने दिलेला ताण आणि त्यातच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे टोमॅटो पिकास मोठा फटका बसला आहे. झाडास लागलेले टोमॅटो गळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे गळालेले टोमॅटो गोळा करून रस्त्याच्या बाजूला टाकत आहेत. परिणामी, गावच्या मार्गावर दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ हे भाजीपाला उत्पादनात मराठवाड्यात अग्रेसर असे गाव आहे. येथील बहुतांश शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. या भागातील टोमॅटो जिल्ह्याबरोबरच मराठवाडा, परराज्यात विक्रीसाठी जातो. येथील टोमॅटोस चांगली चव असल्याने अधिक मागणी असून भावही चांगला मिळतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून युवा शेतकरीही टोमॅटो उत्पादनाकडे वळले आहेत. टोमॅटोचे पीक हे साधारणत: चार महिन्यांचे आहे. रोपांच्या लागवडीनंतर दोन महिन्यांनी टोमॅटो काढण्यास सुरुवात होते. पुढील दोन महिने उत्पन्न घेता येते.

यंदाही या भागातील शेतकऱ्यांनी जवळपास ४०० एकरवर टोमॅटोची लागवड केली आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्यावर परिणाम झाला आहे. दरम्यान, काही शेतकरी सिंचनाद्वारे भाजीपाला घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, सध्या टोमॅटोवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे टोमॅटोवर काळा डाग पडत असून रोपांचे टोमॅटो आपोआप गळून पडत आहेत. त्यामुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी महागड्या विविध औषधांच्या फवारण्या केल्या. मात्र, त्याचा काहीही परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी दररोज सकाळी संपूर्ण शेतातील गळालेले टोमॅटो एकत्र करुन रस्त्यावर फेकून देत आहेत.

दरम्यान, काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला सडलेले टोमॅटो टाकल्याने दुर्गंधी पसरून ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच गावातील गटारी तुंबल्याने डासोत्पत्ती वाढली असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

एकरी लाख रुपयांपर्यंत खर्च...

मी चार एकरवर टोमॅटोची लागवड केली आहे. त्यासाठी रोप, बांबू, तार, सुतळी, खत, खुरपणी, फवारणीसाठी जवळपास एक लाखाचा खर्च झाला आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने रोपांची वाढ खुुंटली आहे. याशिवाय, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे टोमॅटोस काळा डाग पडून ते आपोआप गळून पडत आहेत.

- बाळू कुलकर्णी, शेतकरी, वडवळ.

फवारणी करूनही फारसा उपयोग नाही...

आम्ही बऱ्याच ठिकाणच्या प्लॉन्टची पाहणी केली. तापमान वाढल्याने मावा, छोट्या-छोट्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी विविध औषधांची फवारणी केली आहे. परंतु, त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे, असे कृषी सहायक संदीप स्वामी यांनी सांगितले.

गावात स्वच्छता मोहीम...

रस्त्याच्या बाजूला सडलेले टोमॅटो टाकण्यात आल्याने दुर्गंधी पसरत आहे. तसेच गावातील गटारी तुंबल्या आहेत. ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे, असे ग्रामपंचायत सदस्य सागर नवने म्हणाले.

गावातील नाल्यांची लवकरच सफाई केली जाईल. तसेच धूर फवारणी करण्यात येईल, असे सरपंच मुरलीधर सोनकांबळे म्हणाले.

Web Title: Damaged by taxes, farmers throw tomatoes on the side of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.