पुलाअभावी पाण्यातून धोकादायक प्रवास; नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू
By हरी मोकाशे | Published: September 7, 2022 06:09 PM2022-09-07T18:09:34+5:302022-09-07T18:10:20+5:30
मांजरा नदीवर पूल व्हावे म्हणून काही वर्षांपासून हंचनाळ, नदीवाडी, धनेगाव येथील नागरिकांची मागणी असून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
वलांडी (जि. लातूर) : धनेगाव- हंचनाळ हा जवळचा मार्ग मांजरा नदीपात्रातून आहे. मात्र, या नदीपात्रावर पूल नाही. त्यामुळे नदी पात्रातील टोकऱ्या (कडई) तून प्रवास करावा लागतो. दरम्यान, नदीवाडी येथील एक तरुण या टोकऱ्यापासून गावाकडे जाताना पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.
स्वप्नील राजेंद्र पाटील (३०, रा. नदीवाडी) असे मयताचे नाव आहे. स्वप्नील पाटील हा मंगळवारी शिऊर, धनेगाव येथे काही कामानिमित्त गेला होता. सायंकाळी उशिरा तो गावाकडे परतण्यासाठी हंचनाळजवळील टोकऱ्यावर आला. तेव्हा मांजरा नदी पात्रात पाण्याची धार सुरू असल्याने तो टोकरा (कडई) बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, त्याचा नदी पात्रातून जाताना पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे.
मांजरा नदीपात्रातून देवणी तालुक्यातील धनेगावला जाण्यासाठी हंचनाळ, नदीवाडी, चिचाेंडी, होसुर, हलगरा येथील नागरिक, विद्यार्थी दररोज ये- जा करतात. या मार्गावरील मांजरा नदी पात्रावर पूल नसल्यामुळे नागरिकांना टोकऱ्यातून रस्ता ओलांडावा लागतो. मांजरा नदीवर पूल व्हावे म्हणून काही वर्षांपासून हंचनाळ, नदीवाडी, धनेगाव येथील नागरिकांची मागणी असून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही, असे हंचनाळ येथील सरपंच मधुकर थोटे यांनी सांगितले. मयत स्वप्निल पाटील यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत औराद शहाजानी पोलीस ठाण्याअंतर्गत कुठलीही नोंद नसल्याचे बीट अंमलदार हरणे यांनी सांगितले.