लातूर रोड येथे दिवसा घरफोडी, दागिन्यांसह रोख रक्कम लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:15 AM2021-07-04T04:15:11+5:302021-07-04T04:15:11+5:30
लातूर रोड येथील सोपान पितांबर नरहरे हे त्यांची पत्नी, मुलांसह शनिवारी सकाळी १०.३०वा.च्या सुमारास शेतात कामासाठी गेले होते. तासभराने ...
लातूर रोड येथील सोपान पितांबर नरहरे हे त्यांची पत्नी, मुलांसह शनिवारी सकाळी १०.३०वा.च्या सुमारास शेतात कामासाठी गेले होते. तासभराने सोपान नरहरे हे पाणी पिण्यासाठी घराकडे आले. तेव्हा घराच्या दाराचे कुलूप तोडून खाली पडलेले दिसले, तसेच बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दारही उघडले दिसले. त्यामुळे त्यांनी पाहिले असता, त्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, सात ग्रॅमचे मंगळसूत्र, ६ ग्रॅमचे कानातील झुमके आणि रोख २ हजार रुपये असा ९२ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळविल्याचे दिसून आले.
चोरट्यांनी नरहरे परिवारावर पाळत ठेवून चोरी केली आहे. कपाटातील प्रत्येक कपडे काढून अस्ताव्यस्त टाकून पाहणी केली आहे. या प्रकरणी नरहरे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिसांत कलम ४५४, ३८० भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी...
या घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, सहायक पोलीस निरीक्षक नलिनी गावडे, पोउपनि खंडू दर्शने, पोहेकॉ.मारोती तुडमे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच पंचनामा केला. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते, तसेच दिवसा झालेल्या या चोरीमुळे स्थानिक गुन्हा शाखेची पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
लातूर रोड येथील एका जवानाच्या घरावर चार दिवसांपूर्वी पहाटे दरोडा पडला होता. त्या पाठोपाठ ही घटना घडल्याने पोलिसांबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.