बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; आता २५ लाख मिळणार, हल्ला झाल्यास १९२६ वर करा कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 07:41 PM2024-12-03T19:41:56+5:302024-12-03T19:42:16+5:30
शासनाकडून वारसदारास देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्यात आली आहे
लातूर : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कोणीही जखमी, जायबंदी अथवा मृत्यूमुखी पडल्यास मदतीपोटी देण्यात येणाऱ्या रकमेत शासनाने वाढ केली आहे. विशेषत: बिबट्याच्या हल्ल्यात एखादा व्यक्ती दगावल्यास आता २५ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
दरवर्षी नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील रेणापूर, लातूर, अहमदपूर तालुक्यातील काही गावांत बिबट्या दिसून येतो. यंदा तर उदगिरातील मानवी वस्तीत बिबट्या आल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्याच्या शोधासाठी वन विभागाने पथके तयार केली आहेत. ड्रोन कॅमेराच्या आधारे बिबट्याचा ठावठिकाणा शोधला जात आहे. मात्र, अद्यापही बिबट्या सापडला नाही. या घटनेमुळे नागरिकांत दहशत वाढली आहे.
दरम्यान, यापूर्वी बिबट्या श्वान, शेळीची शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत. आजपर्यंत ऊस क्षेत्राच्या भागातच बिबट्या काही शेतकऱ्यांना आढळला आहे. त्याची वन आणि महसूल विभागाला तत्काळ माहिती देण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन करण्याबरोबर जेरबंद करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे.
२० ऐवजी आता २५ लाख मिळणार...
बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला वन विभागाच्या वतीने २० लाख रुपयांची भरपाई देण्यात येत होती. आता २५ लाख मिळणार आहेत.
बिबट्या सर्वाधिक आढळला या भागात...
साधारणत: बिबट्या ऊस क्षेत्र भागात आढळून येत आहे. जिल्ह्यातील रेणापूर, लातूर, अहमदपूर भागात सर्वाधिक वेळा बिबट्या आढळून आला आहे.
या प्राण्यांकडून हल्ला झाल्यास मिळते मदत...
बिबट्या, वाघ, अस्वल, रानडुक्कर, कोल्हा, हत्ती, लांडगा अशा प्राण्यांकडून हल्ला झाल्यास आर्थिक मदत देण्यात येते.
जखमी/ अपंगत्व आल्यास मदत मिळते का?...
बिबट्याच्या हल्ल्यात अपंगत्व आल्यास पाच लाखांची, गंभीर जखमी झाल्यास एक लाख २५ हजारांची मदत मिळत असे. आता जायबंदी झाल्यास साडेसात लाखांची मदत मिळते. किरकोळ जखमी असल्यास औषधोपचार करण्याचा खर्च मिळतो.
हल्ला झाल्यास १९२६ वर करा कॉल...
वन्य प्राण्याने हल्ला केल्यास वन विभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून माहिती देता येते. शिवाय, वन विभागासही माहिती देता येते. त्यानंतर कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करतात.
वारसदाराला धनादेश अन् खात्यावर एफडी...
मृताच्या जवळच्या वारसदाराच्या नावे भरपाईचा धनादेश देण्यात येतो. तसेच बँक खात्यावर वारसाच्या नावाने एफडी केली जाते.
वन विभाग सतर्क, नागरिकांत जागृती...
सुदैवाने गत अकरा महिन्यांत वन्य प्राण्यांचा लातूर परिमंडळात एकही हल्ला झाला नाही. बिबट्या आढळल्याची माहिती मिळताच वन विभाग सतर्क होऊन नागरिकांत जनजागृती करीत आहे.
वन्य प्राण्यांचा हल्ला झाल्यास भरपाई...
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कोणीही गंभीर जखमी, जायबंदी झाल्यास अथवा मृत्यूमुखी पडल्यास वन विभागाकडून आर्थिक मदत दिली जाते. घडलेल्या घटनेची जखमी अथवा दगावलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी वन विभागास किंवा टोल फ्री क्रमांकावर माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे.
- एन. एस. बिराजदार, वन परिमंडळ अधिकारी, लातूर.