महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग! लातूर-जहीराबाद महामार्गावर पुन्हा अपघातात एकाचा मृत्यू
By संदीप शिंदे | Published: November 28, 2023 06:16 PM2023-11-28T18:16:35+5:302023-11-28T18:17:35+5:30
लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावरील निलंगा ते औराद शहाजनी, निलंगा ते केळगाव मार्गावर रस्ता झाल्यापासून सातत्याने अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे.
निलंगा/औराद शहाजानी : निलंगा येथून औराद शहाजानीकडे येत असताना अज्ञात वाहनाने धडक देऊन दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना मंगळवारी पहाटे अनसरवाडा पाटीजवळ घडली. यामध्ये दुचाकीस्वार ठार झाला असून, माधव व्यंकटराव तरुरे (वय ५२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
औराद शहाजनी येथील माधव व्यंकटराव तुरुरे (वय ५२ रा. कोटमाळ ता. हुलसूर, कर्नाटक) हे २५ वर्षांपासून औराद बाजार समितीमध्ये मुनीम म्हणून काम करतात. सोमवारी सुट्टी असल्याने ते खासगी कामासाठी गावी गेले होते. मंगळवारी पहाटे ते दुचाकी क्रमांक एम.एच. २४ एई ७३११ ने निलंग्याकडून औराद शहाजानीकडे येत असताना अनसरवाडा पाटीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात तरुरे यांचा जागीच मृत्यू झाला. निलंगा उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, औराद शहाजानी येथील बाजार समितीमध्ये माधव तरुरे मुनीम म्हणून काम करत होते. मंगळवारी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच औराद शहाजानी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग...
लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावरील निलंगा ते औराद शहाजनी, निलंगा ते केळगाव मार्गावर रस्ता झाल्यापासून सातत्याने अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. महामार्गावर खड्डे पडले असून अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. दुचाकीची चाके भेगामध्ये अडकत असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गावर प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.