विळेगावातील युवकाचा मृत्यू; ११२ दिवसांनंतर खुनाचा गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: May 24, 2024 09:32 PM2024-05-24T21:32:27+5:302024-05-24T21:32:35+5:30
न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश
राजकुमार जाेंधळे / अंधोरी (जि. लातूर) : अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथील अरविंद पंढरी तेलंगे या युवकाचा मृतदेह विळेगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात आढळून आला हाेता. याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल ११२ दिवसांनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, अरविंद तेलंगे यांच्या वडिलांनी हा मृत्यू आकस्मिक नसून ताे खून असल्याचे म्हटले आहे. अरविंदचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातूनच हा खून करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात म्हटले हाेते. मात्र, याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याप्रकरणी त्यांनी अखेर छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली हाेती. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अरविंद तेलंगे हा २१ जानेवारी २०२४ रोजी कोणाचा तरी फोन आला म्हणून घरातून निघून गेला हाेता. तो घरी परतलाच नाही. त्याचा मृतदेह विळेगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात २३ जानेवारी रोजी आढळून आला.
याप्रकरणात वडील पंढरी तेलंगे यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार किनगाव पोलिस ठाण्यात दिगंबर सोपान तेलंगे, राम गंगाधर तेलंगे, साईनाथ सोपान तेलंगे, अर्चना दिगंबर तेलंगे, शीतल साईनाथ तेलंगे, अंजली दिगंबर तेलंगे आणि इतर नातेवाइकांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास अहमदपूर उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर करीत आहेत.