लातुरात शाळकरी मुलीचा मृत्यू; पाेलिस ठाण्यात नातेवाइकांचा ठिय्या
By राजकुमार जोंधळे | Published: June 29, 2024 08:18 PM2024-06-29T20:18:42+5:302024-06-29T20:19:17+5:30
सोलापुरात होणार पुन्हा इन-कॅमेरा शवविच्छेदन
राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील नांदेड रोड परिसरात शासकीय वसतिगृहात असलेल्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत विवेकानंद चाैक पोलिस ठाण्यात नाेंद आहे. दरम्यान, नातेवाइकांनी मृतदेहाचे पुन्हा इन-कॅमेरा शवविच्छेदन करावे, अशी मागणी करत शनिवारी दुपारी पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडला. दरम्यान, आता सोलापूर जिल्हा रुग्णालयात पुन्हा इन-कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे.
पोलिसांनी सांगितले, लातुरातील पूर्व भागात नांदेड रोड परिसरात असलेल्या एका मागासवर्गीय वसतिगृहात १५ वर्षीय मुलगी वास्तव्याला हाेती. दरम्यान, ती खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. याबाबत विवेकानंद चाैक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदन लातुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आले. नातेवाइकांनी शनिवारी मृतदेह ताब्यात न घेता पुन्हा इन-कॅमेरा शवविच्छेन करण्याची मागणी करत पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नातेवाइकांची समजूत काढत इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वातावरण निवळले.
सोलापुरातील रुग्णालयात होणार पुन्हा शवविच्छेदन...
नातेवाइकांच्या मागणीनुसार आम्ही मुलीच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम लातुरातील सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. आता सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रविवारी सकाळी इन-कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे, अशी माहिती विवेकानंद चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी दिली.