उदगीरच्या दोन सख्याभावांचा गाणगापूरच्या भीमा-अमरजा संगमावर बुडून मृत्यू
By संदीप शिंदे | Published: September 26, 2024 04:14 PM2024-09-26T16:14:47+5:302024-09-26T16:16:59+5:30
गाणगापूर येथील घटना : देवदर्शनासाठी गेलेल्या डोईजोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
उदगीर (जि.लातूर) : गाणगापूर येथील भीमा-अमरजा नदी संगमात स्नानासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू झाला तर डोईजोडे यांचा मुंबईचा मित्रही पाण्यात बुडाल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
उदगीर येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे राहत असलेले सिने दिग्दर्शक व भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. महेश डोईजोडे हे आपल्या मित्रांना सोबत घेवून कुटुंबियांसह मुंबईहून गाणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते. महेशने त्याचा भाऊ बाळासाहेब डोईजोडे यालापण उदगीरहून कुटुंबियांसह गाणगापूरला येण्यासाठी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब डोईजोडे यांनीही आपले कुटुंब घेवून उदगीरहून गाणगापूरला पोहचले होते. डोईजोडे व पाटील कुटुंबातील सर्व सदस्य बुधवारी एका लॉजवर थांबले होते.
गुरुवारी सकाळी ॲड. महेश डोईजोडे (४७) व त्यांचा भाऊ बाळासाहेब डोईजोडे (४९), मुंबईचा मित्र कैलास पाटील हे तिघेजण गाणगापूरच्या भीमा-अमरजा नदी संगमात स्नानासाठी गेले असता ॲड. महेश व बाळासाहेब या दोघा भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर कैलास पाटील यांच्या तोंडात व पोटात पाणी गेल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गाणगापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत बाळासाहेब डोईजोडे हे उदगीर येथील शेटकार इस्टेटमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची सेवा करीत होते. गाणगापूर येथे ॲड. महेश व बाळासाहेब यांच्या प्रेताची उत्तरीय तपासणी करून दोघांचेही प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दोघांही भावांवर शुक्रवारी सकाळी उदगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.