राजीव सातव यांच्या निधनाने तरुण संघटक हरवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:17 AM2021-05-17T04:17:52+5:302021-05-17T04:17:52+5:30
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या राजीव सातव यांची देशपातळीवर छाप होती. उत्कृष्ट संसदपटू म्हणून केंद्र सरकारने त्यांचा गौरव ...
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या राजीव सातव यांची देशपातळीवर छाप होती. उत्कृष्ट संसदपटू म्हणून केंद्र सरकारने त्यांचा गौरव केला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. सातव यांच्या अकाली निधनाचे दु:ख वेदनादायी आहे. त्यांच्या रुपात काँग्रेस पक्षाने एक तरुण व कर्तबगार नेतृत्व गमावले. यात पक्षाची मोठी हानी झाली आहे. जिल्हा पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत मोठी झेप घेणाऱ्या या उमद्या नेत्याबद्दल संपूर्ण देशाला कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी तर ते अभिमान होते. त्यांच्या जाण्याने ग्रामीण भागातील विकासात्मक तरुण चेहऱ्याला काँग्रेस मुकली आहे. त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली.
- माजी मंत्री दिलीपराव देशमुख
उमद्या मनाचा सहकारी गमावला
काँग्रेसचे नेते खा. राजीव सातव यांचे निधन ही अतिशय दु:खद घटना आहे. काँग्रेस पक्षाचा युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आपल्या मितभाषी स्वभावाने त्यांनी सर्वांच्या मनात घर केले होते. युवक काँग्रेसमध्ये काम करीत असताना त्यांचे मार्गदर्शन सतत लाभत असे. त्यांच्या अकाली निधनाने एका उमद्या मनाच्या सहकाऱ्यास आपण मुकलो आहोत. - आ. धीरज देशमुख
मराठवाड्याचा कर्तबगार नेता
पंचायत समिती ते संसदेपर्यंत यशस्वी प्रवास करणारे खा. राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडत राज्यातच नव्हे, तर देशात आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली. मितभाषी, कुशल संघटक व दूरदृष्टीचे नेतृत्व होते. अत्यंत कमी वयात त्यांनी राष्ट्रीय पातळीवर यशस्वीपणे काम केले. माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध होते. त्यांच्या निधनामुळे राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्याचा कर्तबगार नेता आपण गमावला.
- माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर
उत्कृष्ट संसदपटू अशी ओळख
खा. राजीव सातव यांचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून केंद्र शासनाने गौरव केला होता. मराठवाड्यातून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपल्या कार्यातून ओळख निर्माण केली होती. गांधी कुटुंबियांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे मराठवाडा व राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. भविष्यातील काँग्रेसचे ते युवा नेते होते. त्यांच्या निधनाने मराठवाड्याचा हिरा गमावला. - श्रीशैल उटगे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस