विद्यार्थिनीचा मृत्यू; मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल
By admin | Published: February 14, 2017 09:38 PM2017-02-14T21:38:01+5:302017-02-14T21:38:01+5:30
इयत्ता दहावीत शिकणाऱ्या बालिका विनायक चिकटे या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 14 - रेणापूर तालुक्यातील बावची येथील समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या बालिका विनायक चिकटे (१६, रा. हाडोळी बेलगाव ता. चाकूर) या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात विनायक चिकटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. पांचाळ यांच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बावची (ता. रेणापूर) येथे समाजकल्याण विभागाच्या वतीने मुलींची निवासी शाळा चालविली जाते. या शाळेत १७५ मुली सध्या शिक्षण घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बालिका चिकटे या विद्यार्थिनीला ताप, मळमळ आणि उलट्या होत होत्या. दरम्यान, शाळेतील कर्मचाऱ्यांनी बालिका हिला रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर रविवारी पहाटे अचानक बालिकाची तब्येत बिघडली. तातडीने रेणापूर रुग्णालयात बालिका हिला दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी लातूरला हलविण्यास सांगितले. लातूर येथे बालिका चिकटेचा मृत्यू झाला. या प्रकरणी बालिकाचे वडील विनायक देवीदास चिकटे यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. माझ्या मुलीच्या मरणास जबाबदार असणाऱ्या मुख्याध्यापिका एस.एस. पांचाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून अधीक्षक, समाजकल्याण आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी रेणापूर पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.