तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी, सर्वसामान्यांना त्रास; अट्टल गुन्हेगार लातूरातून हद्दपार
By हरी मोकाशे | Published: May 25, 2023 07:39 PM2023-05-25T19:39:21+5:302023-05-25T19:39:59+5:30
शिरुर अनंतपाळच्या पोलिस निरीक्षकांनी आरोपीस हद्दपार करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता.
निलंगा : तहसीलदारांना हुज्जत घालून जीवे मारण्याची धमकी देत सर्वसामान्यांना, व्यापाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या शिरूर अनंतपाळमधील एकास वर्षभरापासून उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
शिरूर अनंतपाळ येथील गर्जन उर्फ सिध्दांत उत्तम गायकवाड याच्यावर शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गाडी अडवून मारहाण करणे, तसेच व्यापाऱ्यांना धमकी देऊन जबरदस्तीने पैसे घेऊन मारहाण करणे. शहरात दहशत निर्माण करून अवैध वाळू उपसा करणे, महसूलच्या अधिकाऱ्यांना ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल होते.
दरम्यान, शिरुर अनंतपाळच्या पोलिस निरीक्षकांनी सदरील व्यक्तीस हद्दपार करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यावरुन २३ ऑगस्ट २०२१ रोजी चाकूरच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशी अहवालावरून सदरील व्यक्तीस लातूर, धाराशिव व नांदेड या तिन्ही जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करावे, अशी शिफारस निलंग्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. दरम्यान, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी वादी व प्रतिवादींना नोटीस बजावून म्हणणे ऐकून घेतले. त्यात सदरील व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी त्यास जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.