कर्जाला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:24 AM2021-08-13T04:24:24+5:302021-08-13T04:24:24+5:30
शुभम रामलिंगअप्पा मठपती (२७, रा. जळकोट) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. शुभम मठपती हे अल्पभूधारक असून त्यांच्या नावावर ...
शुभम रामलिंगअप्पा मठपती (२७, रा. जळकोट) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. शुभम मठपती हे अल्पभूधारक असून त्यांच्या नावावर बँकेेचे कर्ज होते. यंदाच्या खरीप हंगामात पीक उत्पादनातून कर्ज फिटेल अशी आशा होती. परंतु, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतातील पीक कोमेजून जात होते. त्यामुळे ते चिंताग्रस्त झाले होते. त्यातून त्याने बुधवारी रात्री घरातील स्लॅबच्या लोखंडी पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केली.
नेहमीप्रमाणे त्यांचा भाऊ प्रदीप हा शुभमला उठविण्यासाठी खोलीत गेला असता त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोउपनि. अहमद पठाण व पोलीस करीत आहेत.
८ दिवसांपूर्वी झाला होता विवाह...
शुभम या विवाह ८ दिवसांपूर्वी झाला होता. त्याच्या अंगावरील हळद अजून निघाली नव्हती. त्याची पत्नी नागपंचमी सणानिमित्ताने कर्नाटकातील मुरकी येथे माहेरी गेली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली. मयत शुभम याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.
मृत्यूपूर्वी दोन पानांचे पत्र...
शुभमने आत्महत्येपूर्वी दोन पानांचे पत्र लिहिले आहे. त्यात गडी समोरील लिंबाच्या झाडाखाली दररोज बसणाऱ्या मित्र परिवाराचा आणि आपले आई- वडील व भावाचा उल्लेख करीत सर्वांची क्षमा मागितली आहे. आपल्या मृत्यूस कोणीही कारणीभूत नाही, असे म्हटले आहे. दोन पानांचे पत्र ऐकल्यानंतर अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकत होते.