दुष्काळ जाहीर करुन अनुदान द्या; लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 06:33 PM2023-09-11T18:33:26+5:302023-09-11T18:33:49+5:30
चाकूर तालुक्यातील झरी बु. येथून शेतकरी जनआक्रोश मोर्चास प्रारंभ झाला.
लातूर : कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावे. पीकविमा मंजूर करावा, गेल्या वर्षीच्या खरीप पीकविम्याचे वाटप करण्यात यावे, अशा मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
चाकूर तालुक्यातील झरी बु. येथून शेतकरी जनआक्रोश मोर्चास शनिवारी प्रारंभ झाला. जानवळ, दापक्याळ, नांदगाव, आष्टामोड, ममदापूर, भातखेडा, कोळपा मार्गे पायी चालत सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या आंदोलनात गणेश सूर्यवंशी, निलेश देशमुख, भागवत कुसंगे, माऊली वाकळे, अशोकराव वाकळे, राम पाटील यांच्यासह झरी खु., जानवळ, हाडोळी, बेलगाव, नायगाव, जढाळा, केंद्रेवाडी, नांदगाव, नळेगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सोयाबीनला ७ हजार, तुरीला १० हजार तर कापसाला १२ रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव द्यावा. लम्पीच्या प्रादुर्भावामुळे ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. त्यांना तात्काळ मदत द्यावी. पशुधनासाठी चारा छावण्या सुरु कराव्यात. अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवर वास्तव्य करणाऱ्यांच्या नावावर ती जागा करावी. शेतकरी सन्मान निधीत वाढ करुन ती वार्षिक २५ हजार रुपये करावी. तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी पेरणीसाठी हेक्टरी १० हजारांप्रमाणे मदत द्यावी. वयोवृध्द शेतकऱ्यांना मासिक ५ हजार रुपये मानधन देण्यात यावे. शेतीस दिवसा सलग १२ तास वीजपुरवठा करण्यात यावा. दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.