मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; मंत्र्यांचा 'छावा'ने रोखला ताफा, लातुरात आंदोलन
By हरी मोकाशे | Published: September 17, 2023 03:36 PM2023-09-17T15:36:56+5:302023-09-17T15:37:13+5:30
मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील डॉ. आंबेडकर पार्क येथील हुतात्मा स्मारकात आयोजित कार्यक्रमासाठी मंत्री संजय बनसोडे हे निघाले होते.
लातूर : पाऊस नसल्याने शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पीकविमा देण्यात यावा, अशा घोषणा करीत अखिल भारतीय छावा संघटनेने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा रविवारी सकाळी ताफा रोखून घरासमोर सकाळी ठिय्या आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील डॉ. आंबेडकर पार्क येथील हुतात्मा स्मारकात आयोजित कार्यक्रमासाठी मंत्री संजय बनसोडे हे निघाले होते. तेव्हा अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना रोखत ठिय्या आंदोलन केले. यावेळी छावा संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, भगवान माकणे, दीपक नरवडे, मनोज लंगर, मनोज फेसाटे, रमाकांत करे, बाजीराव एकुर्गे, बालाजी निकम, शिवशंकर सूर्यवंशी, पांडुरंग कोळपे, बालाजी माळी, सुदर्शन ढमाले, गोपाळ चाळक, अक्षय जावळे, किशोर पवार आदी उपस्थित होते.
सध्या मराठवाड्यात दुष्काळाची भयानक परिस्थिती आहे. सरकारने पीकविम्यासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ फसव्या घोषणा करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरी मराठवाड्यातील शेतकरी दैयनीय अवस्थेत जगत आहे. सिंचन, पाणी असे विविध प्रश्न आहेत. सरकारने मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
शेतकरी राजास वाऱ्यावर सोडणार नाही...
शनिवारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळावर गंभीरपणे अर्धा ते पाऊस तास चर्चा झाली. बैठकीत काही निर्णयही झाले आहेत. शेतकऱ्यांना २५ टक्के आग्रीम देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मी ही शेतकरी अन् कार्यकर्ता आहे. त्यामुळे तुमची तळमळ मी समजून घेऊ शकतो. शेतकरी राजास वाऱ्यावर सोडणार नाही, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.