मुगाच्या उताऱ्यात ४० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:24 AM2021-09-05T04:24:14+5:302021-09-05T04:24:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर अनंतपाळ : खरिपातील मुगाच्या राशींचा हंगाम सुरू झाला असून, कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीच्यावतीने ...

Decrease in Muga yield by 40% | मुगाच्या उताऱ्यात ४० टक्क्यांनी घट

मुगाच्या उताऱ्यात ४० टक्क्यांनी घट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर अनंतपाळ : खरिपातील मुगाच्या राशींचा हंगाम सुरू झाला असून, कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीच्यावतीने संयुक्त पीक कापणी प्रयोग घेतले जात आहेत. तालुक्यातील सावरगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतात घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगात मुगाच्या उताऱ्यात ४० टक्क्यांची घट झाल्याचे आढळून आले आहे. लागवडीचा खर्चही पदरी पडत नसल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीनसह सर्व पिकांना विमा लागू करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक उत्पन्न सोयाबीनचे घेतले जाते. त्यामुळे प्रत्येकवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत आहे. यंदा एकूण लागवड २८ हजार ५०० हेक्टरपैकी २३ हजार ७०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी मूग, उडिदाची पेरणी केली होती. मृग नक्षत्रात पावसाने वेळेवर हजेरी लावली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सोयाबीनसह मूग, उडीद बहरले होते. परंतु, ऐन फुल, फळ धारणेच्या कालावधीत पावसाने जवळपास महिनाभर ताण दिला होता. त्यामुळे माळरानावरील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके करपली. त्यामुळे माळरानावरील मुगाचा उतारा कमालीचा घटला आहे. शिवाय कसदार जमिनीतील उताऱ्यात ४० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. खरीप हंगामातील पिकांना पीक विमा लागू करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

तालुक्यात ३२३ हेक्टरवर मूग...

शिरूर अनंतपाळ तालुक्यात यंदा मुगाचा पेरा घटला असून, एकूण लागवडीच्या केवळ ३२३ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे. उडिदाचे क्षेत्र त्यापेक्षा कमी झाले असून, केवळ १५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरा कमी आणि उत्पादनात घट आल्याने शेतकरी हतबल होत आहेत.

शेतकरी झाले हतबल...

तालुक्यातील विविध गावांमध्ये सध्या मूग, उडिदाच्या राशी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, तालुका कृषी कार्यालय आणि पीक विमा कंपनीच्यावतीने सावरगाव येथील शेतकरी राजेंद्र माने यांच्या शेतात पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. यावेळी एकरी २ क्विंटल ३६५ ग्रॅमचा उतारा आला आहे. सरासरी उत्पादनात ४० टक्क्यांची घट झाली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पेरणीसाठी झालेल्या लागवडीचा खर्चही पदरी पडत नसल्याचे शेतकरी राजेंद्र माने, कल्याणराव बिरादार, योगेश बिरादार, सीताराम पाटील, बालाजी बिरादार, शिवाजीराव बिरादार यांनी सांगितले.

सरसकट पीक विमा लागू करावा...

खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीनचे पीक बहरले असताना ऐन फुल-फळ धारणेच्या कालावधीत पावसाने जवळपास महिनाभर ताण दिल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सरसकट पीक विमा लागू करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.

Web Title: Decrease in Muga yield by 40%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.