लातूर बाजार समितीत नव्या तुरीची आवक वाढल्याने दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 06:57 PM2019-01-02T18:57:41+5:302019-01-02T18:58:46+5:30
बाजारगप्पा : चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे; परंतु सुरुवातीसच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
- हरी मोकाशे ( लातूर )
शेतकऱ्यांनी तुरीची काढणी करून राशी करण्यास सुरुवात केल्याने लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज नव्या तुरीची जवळपास २५० क्विंटल आवक होण्यास सुरुवात झाली आहे; परंतु बाजारपेठेत मिळणारा दर हा हमीभावापेक्षा कमी असून, तो ४५६० रुपये प्रति क्विंटल आहे़ परिणामी, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे १ हजार ४० रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे.
खरिपातील तूर काढणी व राशीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे़ यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे तुरीच्या शेंगांमध्ये अपेक्षित बी भरणा झाला नाही़ बहुतांश शेतकऱ्यांच्या तुरीचा तर खराटाच झाला़ जे शेतकरी राशी करीत आहेत, त्यांच्या तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे़ दरम्यान, शासनाने तुरीस ५ हजार ६०० रुपये आधारभूत किंमत जाहीर केल्याने आणि गत महिन्यात तूर डाळीच्या दरात वाढ झाल्याने यंदा तुरीला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे; परंतु सुरुवातीसच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीन या शेतमालाची आवक घटल्याने बाजार समितीतील आर्थिक उलाढाल कमी झाली आहे़ गत आठवड्यापासून सोयाबीनला मिळणारा दर कमी झाला आहे़ सध्या सर्वसाधारण दर ३२८० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे़ बाजारपेठेत दररोज सोयाबीनची आवक १७ हजार १२५ क्विंटल होत असून ती स्थिर आहे; परंतु कमाल दरही घसरला असून, तो ३ हजार ३५८ रुपये असा आहे़ नव्या तुरीमुळे आवक वाढली असून ती ४ हजार ७७ क्विंटलपर्यंत पोहोचली आहे़ कमाल दर ४८५० रुपये, सर्वसाधारण दर ४५६०, तर किमान भाव ४३०१ रुपये मिळत आहे.
बाजारपेठेत मुगाची आवक घटली असून २६५ क्विंटल होत आहे़ सर्वसाधारण दर ५२०० रुपये मिळत असून, गत आठवड्याच्या तुलेनत सध्या दरात शंभर रुपयांनी वाढ झाली आहे़ गतवर्षीच्या रबीतील हरभऱ्याची आवक ९७३ क्विंटल होत आहे़ हरभऱ्याच्या दरात शंभर रुपयांनी घट झाली असून, सर्वसाधारण दर ४ हजार ५० रुपयांवर पोहोचला आहे़ बाजरीस सर्वसाधारण दर १९००, गहू- २४००, हायब्रीड ज्वारी- १३५०, रबी ज्वारी- २४५०, पिवळी ज्वारी- ४३००, मका- १६००, उडीद- ४५००, करडई- ४२००, सोयाबीन- ३२८०, तीळ- १२०००, गूळ- २५१५, धने- ४३०० रुपये असा प्रतिक्विंटल दर मिळत आहे़ हिरवा चारा व कडब्याच्या दरात वाढ झाली असून, ४५ रुपयांना एक पेंढी अशा दराने विक्री होत आहे़
वास्तविक पाहता, तुरीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी शासनाने नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे ठरत असतानाही अद्यापही हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत़ हे केंद्र चालविण्यासाठी खाजगी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यातच प्रशासन मश्गुल असल्याचे दिसून येत आहे़ यंदा उडीद, मूग खरेदीसाठीही वेळेवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करीत आपला शेतमाल खुल्या बाजारपेठेत मिळेल त्या दराने विक्री करावा लागला.