कार्यालयात येण्यास विलंब; आंदोलकांनी तहसीलला ठोकले कुलूप
By हरी मोकाशे | Published: December 29, 2023 07:05 PM2023-12-29T19:05:43+5:302023-12-29T19:05:56+5:30
तहसीलमधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नाहीत. त्यामुळे विविध कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागते.
रेणापूर : रेणापूर तहसील कार्यालयातील काही कर्मचारी शुक्रवारी सकाळी वेळेत कार्यालयात आले नसल्याचे पाहून संताप व्यक्त करीत प्रहार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चक्क कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप ठोकत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यामुळे अर्धा तास ये- जा बंद झाली होती.
येथील तहसीलमधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नाहीत. त्यामुळे विविध कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. यासंदर्भात काही नागरिकांनी तक्रारी देऊनही दखल घेण्यात आली नव्हती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजेपर्यंत तहसीलमधील काही कर्मचारी आले नव्हते. त्यामुळे प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांनी येऊन सकाळी ११ ते ११.३० वाजेपर्यंत तहसीलच्या दोन्ही प्रवेशद्वाराला कुलूप लावले. त्यामुळे उशिरा आलेले कर्मचारी बाहेरच होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे, बीट अंमलदार अनंत बुधोडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन राठोड व कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसेच नायब तहसीलदार श्रावण उगिले यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे कुलूप काढण्यात आले.
१० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस...
या प्रकरणाची तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांनी गंभीर दखल घेऊन उशीरा येणाऱ्या १० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच मध्यवर्ती कार्यालय, कृषी, भूमी अभिलेख, सहाय्यक निबंध, उपकोषागार कार्यालयासही सूचना करुन कर्मचाऱ्यांनी वेळेत येण्याच्या खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट केले आहे. यापुढे उशीर झाल्यास कार्यवाही करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.
तीव्र आंदोलन छेडणार
तालुक्यातील बहुतांश कार्यालयातील कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नाहीत. जर यापुढेही असेच आढळून आल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड यांनी दिला आहे.