विमान उड्डाणातील अडचणीमुळे जवानाचे पार्थिव येण्यास उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:17 AM2020-12-23T04:17:02+5:302020-12-23T04:17:02+5:30
निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथील जवान नागनाथ अभंगराव लोभे शहीद झाल्याची घटना २० डिसेंबर ...
निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथील जवान नागनाथ अभंगराव लोभे शहीद झाल्याची घटना २० डिसेंबर रोजी घडली होती. सिक्कीम येथून मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी आणण्यात येणार होते. परंतु सिक्कीम येथे सोमवारी विमान उड्डाण होऊ शकले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांचे पार्थिव गावात येईल. यासंदर्भात तहसीलदार गणेश जाधव म्हणाले, शहीद जवान नागनाथ लोभे यांचे पार्थिव मंगळवारी सिक्कीम येथून दिल्लीला आणण्यात आले आहे. तेथून विमानाने पुण्याला आणले जाईल. बुधवारी सकाळी उमरगा हाडगा येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
गावावर शोककळा...
जवान नागनाथ लोभे हे २० डिसेंबर रोजी सकाळी शहीद झाले आहेत. ही माहिती रविवारी रात्री ग्रामस्थांना कळली. दोन दिवसांपासून ग्रामस्थ पार्थिव येण्याची वाट पाहत आहेत. गावावर दोन दिवसांपासून शोककळा असून गावातील अनेकांच्या चुलीही पेटल्या नाहीत.