हिंदू लिंगायत नोंद असलेल्या जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी
By हरी मोकाशे | Published: October 9, 2023 07:40 PM2023-10-09T19:40:36+5:302023-10-09T19:40:52+5:30
शिवा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
लातूर : वीरशैव लिंगायत समाजातील हिंदू लिंगायत नोंद असलेल्या जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शिवा संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य दत्ताभाऊ खंकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांतअप्पा शेटे, सुभाषअप्पा मुक्ता, गणेश कारभारी, आनंदप्पा खंकरे, उमाकांत आनारगट्टे, चंद्रकांत वैजापुरे, ओमकार रटकलकर, संजय देशमुख, सुमित पारुडकर, रितेश राचट्टे, महादेव कल्याणे, महारुद्र स्वामी, महेश पाटील, श्रीकांत पांढरे, विश्वनाथ बिरादार, महादेव लामतुरे, राम भातांब्रे, युवराज बिराजदार, शिवलिंग स्वामी, अंतेश्वर सोनटक्के, राजू भंडे, रामभाऊ खंदाडे, उमाकांत नागलगावे, शिवदास गंगापुरे, मनोज बिरादार आदींच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
वीरशैव लिंगायत समाजाअंतर्गत असलेल्या ३२ उपजातींना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचे काम संथगतीने सुरु आहे. जिल्ह्यातील समाज बांधवांच्या टीसीवर हिंदू लिंगायत अशी नोंद असल्याने ८० टक्के समाज ओबीसी आरक्षणापासून वंचित आहे. वास्तविक, हिंदू लिंगायत, हिंदू वाणी, हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत वाणी अशा विविध नावांची नोंद असलेल्या सर्व समाज बांधवांची जात एकच असूनही नोंदीच्या कारणास्तव जिल्ह्यातील समाज बांधव न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. याच मागणीसाठी येत्या ३० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.