तीव्रता वाढताच उन्हाळी फळांना मागणी वाढली; टरबूज, खरबूज आणि द्राक्षांना सर्वाधिक मागणी
By हणमंत गायकवाड | Published: April 4, 2023 07:06 PM2023-04-04T19:06:18+5:302023-04-04T19:06:47+5:30
स्थानिक आंब्यांची आवक आणखीन नाही; परंतु अक्षय तृतीयेनंतर स्थानिक आंबा बाजारात आल्यानंतर ग्राहकांचा खरेदीचा कल वाढणार आहे.
लातूर : गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून, ३८ अंशांवर तापमान गेले आहे. यामुळे बाजारात उन्हाळी फळांना मागणी वाढली असून, टरबूज, खरबूज, द्राक्ष, संत्रा, डाळिंब, चिकू, खरबूज, कलिंगड, अननस आदी उन्हाळी फळे बाजारात मोठ्या प्रमाणात आली आहेत. लिंबांनाही मागणी वाढली असून, दुपारच्या वेळी शहरात शरबतच्या गाड्यांवर ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.
संत्रा, नागपूर संत्रा, डाळिंब, टरबूज, खरबूज, चिकू, कलिंगड, अननस आदी उन्हाळी फळांना मागणी वाढलेली आहे. स्थानिक आंब्यांची आवक आणखीन नाही; परंतु अक्षय तृतीयेनंतर स्थानिक आंबा बाजारात आल्यानंतर ग्राहकांचा खरेदीचा कल वाढणार आहे. मात्र, सध्या टरबूज, द्राक्ष या फळांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. विशेषकरून लिंबांना मोठी मागणी आहे. गेल्या महिन्यात पंचवीस रुपये पावकिलोप्रमाणे मिळणारे लिंबू सद्य:स्थितीत पन्नास रुपये पाव झाले आहे. दरवर्षी उन्हाची चाहूल लागताच बाजारात फळे मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. त्यानुसार यंदाही मार्च महिन्यापूर्वीच फळांची आवक सुरू झालेली आहे. सध्या एप्रिला महिना सुरू आहे. त्यामुळे उन्हाचा उकडा अधिक जाणू लागला आहे. उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होत आहेत. त्यामुळे घरी दुपारी थांबल्यानंतर उन्हाळी फळे खाण्याचा मोह नागरिकांना होत आहे. त्यानुसार बाजारात या फळांना मागणी होत आहे. सध्या टरबूज वीस रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत नगात याप्रमाणे मिळत आहे. खरबूज ३० रुपये, द्राक्षे शंभर रुपयांना दीड किलो येत आहेत. उन्हाळ्यात उन्हाळी फळांचे दर वाढलेले असतात, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा द्राक्ष, टरबूज या उन्हाळी फळांची स्वस्ताई आहे. त्यामुळे ग्राहक या दोन फळांच्या खरेदीकडे जास्त आकर्षित होत आहेत.
लिंबूचा भाव बाजारात वाढला...
बाजारामध्ये लिंबांचा भाव सध्या वधारलेला आहे. मार्च महिन्यामध्ये २० रुपये ते २५ रुपये पाव किलो मिळणारे लिंबू आता दोनशे रुपये किलो झाले आहेत. एका महिन्यात लिंबांचा दर दुप्पट झाला आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे दर वाढला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.