दारुसाठी ५०० रुपयांची मागणी; डाेक्यात काठी घालून केला खून
By राजकुमार जोंधळे | Published: October 19, 2024 08:19 PM2024-10-19T20:19:58+5:302024-10-19T20:20:18+5:30
आठवड्यात सहा खूनाच्या घटना : पित्यासह दाेन मुलांविराेधात गुन्हा...
राजकुमार जाेंधळे / औसा (जि. लातूर) : ‘तू आम्हाला दारु पिण्यासाठी ५०० रुपये का दिले नाहीत?’ या कारणावरुन तरुणाच्या डाेक्यात काठी घातली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात आराेपी पिता आणि दाेन मुले अशा एकाच कुटुंबातील तिघांवर शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. वीजर आयुब शेख असे मयत तरुणाचे नाव आहे. पाेलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, औसा शहरातील इंदिरा नगर परिसरात राहणारा वजीर आयुब शेख हा बांधकाम मिस्त्रीचा व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह भागवत हाेता. दरम्यान, नेहमीप्रमाणे तो शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आझाद चौकानजीक तलावाच्या पाळूवर गेला. यावेळी साजीद गदेसवार, असलम गदेसवार आणि आवेज गदेसवार (सर्व रा. गवंडी गल्ली, औसा) यांनी संगणमत करून ‘तू आम्हाला दारु पिण्यासाठी ५०० रुपये का दिले नाहीत?’ असे म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारहाण केली. शिवाय, डाेक्यात काठीने जबर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने वजीर आयुब शेख या तरुणाचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली हाेती. शनिवारी सकाळी पोलिसांनी संशयीत आराेपींना ताब्यात घेतल्यानंतर नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेत दफनविधी केला. मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन औसा पाेलिस ठाण्यात पित्यासह दाेघा मुलाविराेधात कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती सहायक पाेलिस निरीक्षक प्रमोद बोंडले यांनी दिली.
तर दारुची व्यसनाधीनता बेतली तरुणाच्या जीवावर...
औसा शहरातील अवैध दारु विक्री आणि वाढत्या व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम तरुणाईला भोगावे लागत आहेत. सर्वत्र सहज मिळणाऱ्या दारुमुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडत आहे. शिवाय, व्यसनामुळे भांडण-तंट्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यातूनच गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालली आहे. दारुची व्यवसनाधीनता एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. याकडे पाेलिस विभागाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
एकाच आठवड्यामध्ये लातूर जिल्ह्यात सहा खून...
लातूर शहरासह उदगीर, औशा शहरात एकाच आठवड्यात एकूण सहा खुनाच्या घटना घडल्या आहेत. या सहाही गुन्ह्यातील प्रमुख कारण अतिशय क्षुल्लक असल्याचे समाेर आले आहे. सहज झालेल्या वादातून हे खून करण्यात आले आहेत. लातुरातील सार्वजिनक रस्त्यावर तिघा तरुणांचा धारदार शस्त्राने, कत्ती आणि काेयत्याने सपासप वार करत हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. उदगीरात पॅराेलवर सुटलेल्या पतीने पत्नीची गाेळ्या झाडून हत्या केली आणि शुक्रवारी रात्री केवळ दारुसाठी ५०० रुपये का दिले नाहीस? असे म्हणून डाेक्यात काठी घालून ठार मारण्यात आले.