हंडरगुळीत कोविड केअर सेंटर उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:22+5:302021-04-26T04:17:22+5:30
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. सुरुवातीस शहरापर्यंत असलेला कोरोना आता ग्रामीण भागातही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण ...
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. सुरुवातीस शहरापर्यंत असलेला कोरोना आता ग्रामीण भागातही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे कोरोनाची जाणवतात, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. वेळीच उपचार न घेतल्यास श्वसनास त्रास होतो. त्यामुळे सर्दी, खोकला जाणवत असलेले नागरिक उपचारासाठी गर्दी करीत आहेत.
हाळी व हंडरगुळी या दोन्ही गावांची लोकसंख्या जवळपास ३० हजार आहे. हे बाजाराचे गाव असल्याने परिसरातील १५ ते २० गावांतील नागरिकांचा येथे दैनंदिन संपर्क असतो. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज शंभरपेक्षा जास्त ओपीडी असते. शिवाय, खासगी दवाखान्यातही रुग्णांची गर्दी असते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज कोरोना चाचणी केली जात आहे. अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचार करून विलगीकरणात राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात येतो. मात्र, हाळी हंडरगुळी येथे कोविड सेंटर नसल्याने उदगीरला जावे लागत आहे. सध्या शाळा बंद असल्याने येथील शाळांचे वर्ग रिकामेच आहेत. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन वास्तू तयार अवस्थेत उभी आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.