सामाजिक शांततेस धोका पोहचविणारा सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार
By राजकुमार जोंधळे | Published: June 1, 2023 05:35 PM2023-06-01T17:35:37+5:302023-06-01T17:35:55+5:30
विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याने शिरूर अनंतपाळ पोलिसांची कारवाई
लातूर : जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सतत गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. गर्जन उर्फ सिद्धांत उत्तम गायकवाड (रा. शिरूर अनंतपाळ) असे कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, सन २००९ ते २०२१ या कालावधीत मारामारी करणे, दुखापत करणे, गैर कायद्याचे मंडळी जमून हाणामारी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दरोड्यासारखा गंभीर गुन्हा आदी विविध प्रकारची गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली होती. दरम्यान, आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार याच्याकडून कोणत्याही प्रकारचा गुन्हे घडू नये, यासाठी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत.
२०२१ मध्ये पाठविला होता हद्दपारिचा प्रस्ताव...
दरम्यान, २०२१ मध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी आरोपीविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान, हद्दीपरीची कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपारीच्या कारवाईसाठी यांनी केलाय पाठपुरावा..!
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी निलंगा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या हद्दपारिच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा केला.
जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना दणका...
या कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार, उपद्रवी लोकांवर जरब बसून सराईत गुन्हेगाराला लातूर जिल्ह्यातून हद्दपार केल्याने गुन्हेगारी विश्वासातील अट्टल, सराईत गुन्हेगाराला चांगलाच दणका बसला आहे.