आशिव तांडा परिसरात वाहनासह हातभट्टी पकडली, सहा पाेलिसांच्या ताब्यात
By राजकुमार जोंधळे | Published: November 4, 2022 08:54 PM2022-11-04T20:54:17+5:302022-11-04T20:55:35+5:30
याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औसा (जि. लातूर) : चाेरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनासह हातभट्टी दारु जप्त करण्यात आली असून, ही घटना औसा तालुक्यातील आशिव तांडा परिसरात शुक्रवारी घडली. शिवाय, तिर्टट नावाच्या जुगारावर छापा मारुन सहा जणांना पकडले. याबाबत भादा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, आशिव तांडा परिसरातून एका वाहनातून अवैधरित्या चाेरट्या मार्गाने हातभट्टी दारुची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती खबऱ्याने भादा पाेलिसांना दिली. भादा पाेलिसांनी तातडीने आपल्या पथकाच्या मदतीने आशिव तांडा येथे सापळा लावला. दरम्यान, वाहन येत असताना अडवून त्याची झाडाझडती घेतली असता, वाहनातून हातभट्टी दारु आणि निर्मितीसाठी लागणारे रसायन हाती लागले. यावेळी १५० लिटर हातभट्टी दारुचे रसायन, ५० किलाे गूळ असा १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हातभट्टीची वाहतूक आशिव येथील विलास ज्ञानाेबा जाधव हा करत हाेता. तर याच गावातील दीपक ज्ञानू चव्हाण हाही हातभट्टी दारुची विक्री करताना आढळून आला. दरम्यान, परिसरात तिर्रट नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिंसांनी छापा मारुन सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १९ हजार ६०० रुपये असा जवळपास ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत भादा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक विलास नवले, सहायक फाैजदार गिरी, चंद्रकांत सूर्यवंशी, कपील पाटील, केशव चाैगुले, क्षीरसागर यांच्या पथकाने केली.