भाव कमी असूनही शेतकऱ्यांची सोयाबीनलाच पसंती; लातूर जिल्ह्यात ११२ टक्के पेरा
By हरी मोकाशे | Published: July 13, 2024 07:12 PM2024-07-13T19:12:01+5:302024-07-13T19:13:25+5:30
सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर दर ठरतात.
लातूर : गत खरीपात सोयाबीनचे उत्पादन घटले असतानाही बाजारपेठेत दर कमीच राहिला. त्यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीनचे क्षेत्र कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. शिवाय, वेळेवर पाऊसही झाला. परंतु, शेतकऱ्यांनी सोयाबीनलाच पसंती दिली असून आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ८२ हजार ५३६ हेक्टरवर म्हणजे ११२ टक्के पेरा झाला आहे.
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात उशीरा पाऊस झाला. तद्नंतर पावसाने मोठा ताण दिला. परिणामी, उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. उत्पादन घटल्याने दरात चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, सोयाबीन काढणीपासून ते दीपावलीच्या कालावधीपर्यंत चांगला दर राहिला. त्यानंतर मात्र, सातत्याने दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. नव्या खरीप हंगामाच्या तोंडावर भाव वाढतील, अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. सातत्याने ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर राहिला.
५ लाख ८८ हजार हेक्टरवर पेरणी...
पीक - पेरणी
सोयाबीन - ४८२५३६
तूर - ७०९२६
मूग - ६८४४
उडीद - ५८४४
कापूस - १६१८६
सूर्यफुल - १८
कारळ - ५५
तीळ - १३८
भुईमूग - १५३
ज्वारी - ३६६१
बाजरी - १९९
मका - २२७८
तीन तालुक्यांत शंभर टक्के पेरणी...
तालुका - पेरणी (टक्के)
लातूर - १०९.७८
औसा - १०३.२९
अहमदपूर - ९४.०६
निलंगा - ८९.४४
शिरुर अनं. - ९४.३४
उदगीर - ९४.९८
चाकूर - १०२.१७
रेणापूर - ९९.१२
देवणी - ९४.२३
जळकोट - ९९.०६
एकूण - ९८.१३
आतापर्यंत सरासरी २१३ मिमी पाऊस...
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१३.८ मिमी पाऊस झाला आहे. लातूर तालुक्यात ३४३.४, औसा- ३४४.५, अहमदपूर- २८०.६, निलंगा- ३०३, उदगीर- १९७.८, चाकूर- २९४.९, रेणापूर- ३६७.४, देवणी- २१२.४, शिरुर अनंतपाळ- २२८.४, जळकोट तालुक्यात १७०.४ मिमी पाऊस झाला आहे.
सोयाबीन नगदी पीक...
गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे पीक पध्दतीत बदल झाला आहे. सध्या नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल आहे. दोन वर्षापासून दर कमी असले तरी आगामी काळात भाव वाढण्याची आशा आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी केली आहे.
- हनुमंत शेळके, शेतकरी.
सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक...
सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर दर ठरतात. विदेशात सोयाबीन, पेंड याच्या मागणीनुसार दर मिळत असतो. त्याचा स्थानिक बाजारपेठेवर परिणाम होत असतो, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सरासरीपेक्षा अधिक पेरा...
यंदा जिल्ह्यात ४ लाख २८ हजार १२१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात ४ लाख ८२ हजार ५३६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. वेळेवर पाऊस झाल्याने उडीद, मूग, तुरीचेही क्षेत्र वाढले आहे.
- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.