बाेहल्यावर चढण्यापूर्वीच नियतीने साधला डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:19 AM2021-04-24T04:19:17+5:302021-04-24T04:19:17+5:30
खंडाळी : अभियंता असलेल्या मयूरची अन् मयूरीची कुंडली जुळली, गुणही जुळले, दोघांची अनुरूप जोडी जमल्याने तारीखही काढली... दोन्ही कुटुंबांकडून ...
खंडाळी : अभियंता असलेल्या मयूरची अन् मयूरीची कुंडली जुळली, गुणही जुळले, दोघांची अनुरूप जोडी जमल्याने तारीखही काढली... दोन्ही कुटुंबांकडून विवाहाची तयारी सुरु झाली. अशात मयूर तापाने फणफणू लागला. तज्ज्ञांकडून उपचारानंतर त्याची प्रकृती ठणठणीत झाली. पाहता पाहता लग्नाची तारीख जवळ आली अन् पुन्हा तो आजारी पडला. त्यातच त्याचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे मयूरीने रंगवलेल्या भावी स्वप्नांवर पाणी फिरले आहे.
ही घटना अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील आहे. गावातील २४ वर्षीय तरुण मयूर भालचंद्र पडिले हा पुण्यातील एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून होता. त्याचा विवाह मयूरी नामक मुलीशी निश्चित झाला होता. विवाहाची तारीख २५ एप्रिल होती. लग्न समांरभ अवघ्या पंधरा दिवसांवर आला असताना मयूरला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यास अहमदपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती खालावत असल्याने सोलापूरला हलविण्यात आले. तिथे यशस्वी उपचार आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्याने कोरोनावर यशस्वी मातही केली.
परंतु, नियतीचे दुष्ट चक्र मयूरभोवती सुरूच होते. दरम्यान, तो तापाने फणफणला. त्यामुळे त्याला तज्ज्ञ डॉक्टारांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. पुन्हा उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. परंतु, विवाहास तीन दिवस शिल्लक राहिले असताना मयूरने २२ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. ही घटना पंचक्रोशीत समजताच आईवडिलांसह, मित्र परिवार आणि नातेवाइकांना धक्काच बसला. तिकडे वधू घरी विवाहाची तयारी सुरू होती. मात्र, नियतीने डाव साधल्याने मयूरीच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे.
मयूरची ती पोस्ट अखेरची...
मयूरला उपचारानंतर बरे वाटले. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना उद्देशून एक पोस्ट फेसबुकवर टाकली. ती अशी- आज डिस्चार्ज मिळतोय, हे १६ दिवस आयुष्यातील अवघड दिवस होते. या दिवसांत जे पाहिलं ते कोणाच्या नशिबी येऊ नये. अचानक आलेला ताप जेव्हा कोरोनामध्ये बदलतो, तेव्हा किती त्रास होतो याची कल्पना येऊन गेली. आपल्या परिवाराची काळजी घ्या. गोष्टी हलक्यात घेऊ नका!